मुंबई : स्वत:च्याच अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्याला विशेष न्यायालयाने २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच कसलाही विचार न करता नातीला न्याय मिळवून देण्यासाठी मुलाविरोधात आवाज उठवणाऱ्या आईच्या धाडसाचे कौतुक केले.
पोक्सो तरतुदींअंतर्गत ठेवलेल्या आरोपांत विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश भारती काळे यांनी ही शिक्षा सुनावली. कौटुंबिक वादातून आरोपीची पत्नी त्याला सोडून निघून गेली होती. अल्पवयीन मुलगी ही वडील, आजी, काका आणि दोन भावंडांसोबत राहत होती. परंतु मुलाकडून त्याच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले जात असल्याचे कळल्यावर आरोपीच्या आईने पोलिसांत धाव घेतली होती. आपलीच मुलगी आणि आई आपल्याविरोधात न्यायालयात साक्ष का देत आहेत हे आरोपीने सांगितलेले नाही, असेही न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावताना स्पष्ट केले.