मुंबई : दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट येथे गुरुवारी संध्याकाळी एक दुर्मीळ साप आढळला. मित्तल चेंबर या इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ हा सडपातळ असा साप दिसला होता. सर्पमित्र अभिषेक अशोक ठावरे यांनी तातडीने जाऊन सापाची व स्थानिकांची सुरक्षितरीत्या सुटका केली.

हा तपकिरी रंगाचा साप लांबलचक असून त्याच्या अंगावर रेषा आहेत. त्रिकोणी डोके व मांजरीसारखे डोळे आणि डोळय़ात उभ्या बाहुल्या असल्याने मांजऱ्या साप म्हणून ओळखला जातो. भारतात हा साप आढळत असला तरीही त्याचा शहरी भागातील वावर दुर्मीळच आहे. गर्द झाडी हा या सापाचा मूळ अधिवास असल्याने शहरी भागात हा साप सहसा आढळत नाही.