मुंबई : अरबी समुद्रात सापडलेल्या एका दुर्मीळ ‘लॉगरहेड’ समुद्री कासवाचा वाचविण्यात मुंबईतील यलो गेट पोलिसांना यश आले. या कासवाचे वजन सुमारे १०० किलो असून सध्या वन विभागाच्या कांदळवन कक्षाच्या साह्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार करण्यात आले. पुनर्वसनासाठी लवकरच या कासवाचे डहाणू येथे असणाऱ्या समुद्री कासवांसाठी असणाऱ्या उपचार केंद्रात स्थलांतर करण्यात येणार आहे.
यलो गेट पोलीस रविवारी समुद्रात गस्त घालत असताना त्यांना एक विशाल कासव समुद्राच्या पृष्ठभागावर आढळून आले. कासवाला पोहण्यासाठी अधिक कष्ट पडत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याला तातडीने किनाऱ्यावर आणले. त्यानंतर वन्यजीवांसाठी कार्य करणाऱ्या मुंबईतील रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर संस्था (रॉ) व वन विभागाच्या कांदळ वन कक्षाच्या सहकार्याने पशुवैद्यक डॉ. रिना देव यांच्या देखरेखीखाली कासवावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर कासवाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती संस्थेने दिली.
त्याचे पुनर्वसन व आवश्यकता भासल्यास उपचारांसाठी वाईल्ड लाईफ कॉनसेर्व्हशन अँड ऍनिमल वेलफेअर असोसिएशनच्या डहाणू येथील समुद्री कासवांसाठी असलेल्या उपचार केंद्रात पाठवण्यात येईल. मुंबईत समुद्री कासवांसाठी अशा प्रकारचे उपचार केंद्र नसल्याने कासवाची रवानगी डहाणू येथे करण्यात येईल. गेल्या वर्षी १० ऑगस्ट रोजी डहाणू येथून ‘ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या कासवाला वाचविण्यात यश आले होते. पुन्हा अरबी समुद्रात सोडताना या ‘धनलक्ष्मी’ कासवावर सॅटेलाईट टॅग बसविण्यात आला होता. गेल्या महिन्यात सॅटेलाईट टॅगचा सिंग्नल बंद झाला असून आतापर्यंत या कासवाने अरबी समुद्रात ४,७८४ किमी प्रवास पूर्ण केला आहे.
हवामान बदलाचा फटका
लॉगरहेड कासव अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर, हिंदी महासागर तसेच भूमध्य समुद्रात आढळतात. त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण मोठ्या, चौकोनी आकाराच्या डोक्यामुळे त्याला ‘लॉगरहेड’ असे नाव दिले आहे. एका अभ्यासानुसार, समुद्राचे वाढते तापमान व समुद्रातील अन्नस्रोत कमी होत असल्याने या कासवाच्या प्रजनन चक्रावर परिणाम होत आहे.
‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर’ या पर्यावरणासाठी कार्य करणाऱ्या संस्थेने लॉगरहेड प्रजातीच्या कासवांचा समावेश संकटग्रस्त प्रजातींच्या यादीत केला असून भारतातही वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ नुसार या कासवाला अनुसूची १ अंतर्गत संरक्षण दिले आहे.
