आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिधावाटप दुकानदारांनी शुक्रवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेतला आहे. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारे दुकानदार संप करून लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्यांचा परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
शिधावाटप योजनेमार्फत राबविल्या जाणाऱ्या प्रत्येक योजनेचा कागदोपत्री कामकाजाचा अतिरिक्त बोजा दुकानदारांवर टाकला जात असतो तर वर्षांनुवर्षे कमिशन वाढवून मिळत नाही आदी अनेक मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा संप पुकारण्यात आल्याचे शिधावाटप दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अण्णा चव्हाण यांनी सांगितले. या  मागण्याकडे लक्ष न दिल्यास १ जानेवारी २०१३ पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
मुंबईसह ठाण्यामध्ये ३७११ शिधावाटप दुकाने आहेत. या दुकानांमध्ये दररोज हजारो लोक धान्य खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे या संपामुळे कोणत्याही नागरिकाला धान्य मिळण्यापासून वंचित ठेवले गेले तर त्यांच्यावर जीवनावश्यक वस्तू १९५५ कायद्याअंतर्गत कारवाई करणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.