मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील वलयांकित वर्तुळात आपले स्थान बळकट केल्यानंतरही रंगभूमीशी असलेले आपले नाते जपणाऱ्या, नाट्याभिनयाचे धडे घेत, प्रत्यक्ष प्रयोगातून स्वत:ला घडवणाऱ्या दिग्गज कलाकारांची उपस्थिती ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या महाअंतिम सोहळ्याला दरवर्षी लाभली आहे. रंगभूमीवरच्या एका पिढीला पाहात, त्यांच्याकडून प्रेरणा घेत नाटक-चित्रपट माध्यमात आलेल्या या प्रतिभावंतांना ‘लोकांकिका’च्या मंचावरून नव्या पिढीतील रंगकर्मींच्या कलाकृती पाहण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याची उत्सूकता असते. यंदा ‘लोकांकिका’च्या महाअंतिम सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणाऱ्या ख्यातनाम अभिनेत्री रत्ना पाठक शाह या पहिल्यांदाच युवा रंगकर्मींशी संवाद साधणार आहेत.

नाटकाच्या क्षेत्रातील भविष्य म्हणून ज्या नव्या पिढीकडे सातत्याने पाहिले जाते, त्या महाविद्यालयीन रंगकर्मींना राज्यस्तरीय महाविद्यालयीन स्पर्धेचा भक्कम मंच उपलब्ध करून देण्याचा वसा जपणारी ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा लवकरच दशकभराची वाटचाल पूर्ण करणार आहे. या दृष्टीने एका महत्त्वाच्या टप्प्यावर असलेल्या यंदाच्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून तितक्याच ताकदीच्या आणि अभिनयापासून सामाजिक मुद्यांपर्यंत प्रत्येक विषयावर ठाम भूमिका घेऊन पुढे जाणाऱ्या अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांची उपस्थिती लाभणार आहे.

येत्या शनिवार, २० डिसेंबर २०२५ रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरमध्ये रंगणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या महाअंतिम सोहळ्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच अभिनेत्री रत्ना पाठक शाह या युवा रंगकर्मींशी संवाद साधणार आहेत. गेली अनेक वर्षे रंगभूमीवरही साचेबध्द काम करण्यापेक्षा आशयविषयात वा प्रयोगाच्या दृष्टीने नवे काही प्रेक्षकांना देता येऊ शकेल, अशा नाटकांच्या निर्मितीशी त्या जोडल्या गेल्या आहेत. आणि म्हणूनच एकांकिकांच्या माध्यमातून नवे काही सांगू पाहणाऱ्या उद्याच्या रंगकर्मींशी संवाद साधण्यासाठी त्या उत्सूक आहेत.

Award Banner

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या या महाअंतिम सोहळ्यात ठाणे विभागातील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाची ‘थिम्मक्का’, मुंबई विभागातून म. ल. डहाणूकर महाविद्यालयाची ‘जब वुई मेटा’, पुणे विभागातील मॉडर्न महाविद्यालयाची ‘वामन आख्यान’, कोल्हापूर विभागातून राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयाची ‘हाफ वे’, नाशिक विभागाच्या लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची ‘राशोमोन’, नागपूर विभागातून श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची ‘ओझोन’, रत्नागिरी विभागातील फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालयाची ‘तुकारामाची टोपी’ आणि छत्रपती संभाजीनगर विभागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाची ‘बुजगावणं’ अशा आठ एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे. यातून एका महाविद्यालयाची एकांकिका यावर्षीची ‘लोकसत्ता लोकांकिका’ ठरणार आहे.