मुंबई : अभिजात भाषांचा संवर्धन, अध्ययन आणि संशोधनाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधण्यासाठी आयोजिण्यात येणारी ‘अभिजात मराठी भाषा परिषद’ यंदा रत्नागिरीत होणार आहे. २३ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या या परिषदेत अभिजात दर्जा प्राप्त ११ भारतीय भाषांमधील प्रत्येकी १० तज्ज्ञांना निमंत्रित करण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील प्रत्येकी पाच साहित्यिकांचाही परिषदेत सहभाग असेल.

केंद्र सरकारने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतीय अभिजात भाषांचे संवर्धन, अध्ययन, संशोधन आणि सर्वसमावेशक विकास यासंबंधी धोरणात्मक चर्चा घडवून आणण्याकरिता दरवर्षी परिषदेचे आयोजन केले जाते. विविध राज्यांतील तज्ज्ञांमध्ये विचारांची देवाणघेवाण करणे, हा परिषदेचा मुख्य उद्देश आहे. यापूर्वी अमरावतीत ही परिषद झाली होती. यंदा रत्नागिरीत होणाऱ्या परिषदेत विविध भाषांच्या विकासासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर चर्चा होईल. मराठी विकास संस्था, भाषा संचालनालय, रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठ परिषदेची रूपरेषा आणि विविध सत्रे निश्चित करतील.

परिषदेसाठी अभिजात दर्जा प्राप्त ११ भारतीय भाषांमधील प्रत्येकी १० तज्ज्ञांना निमंत्रित केले जाणार आहे. या प्रत्येक भाषेतील निमंत्रितांमध्ये दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असेल. केंद्रीय भारतीय भाषा संस्थेचे संचालक किंवा अन्य अधिकारी, केंद्रीय उच्च शिक्षण व सांस्कृतिक मंत्रालयाचे अधिकारी आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे संबंधित अधिकारी यांनाही निमंत्रित करण्यात येईल.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून पाच साहित्यिकांना निमंत्रित केले जाणार असून, त्यात कवी आणि बोलीभाषांमध्ये लेखन करणाऱ्या साहित्यिकांचाही समावेश असेल. जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये स्थापन करण्याचे प्रस्तावित असलेल्या जिल्हा मराठी भाषा विकास कक्षातील मराठी भाषा अधिकारी आणि सरकारने नियुक्त केलेल्या मराठी भाषा अधिकाऱ्यांनाही परिषदेसाठी निमंत्रित केले जाणार आहे.

मागील परिषदेचे फलित काय?

अमरावतीत झालेल्या परिषदेत ११ अभिजात भाषांकरिता स्वतंत्र मंडळाची संकल्पना पुढे आली. तसेच, विविध भारतीय भाषांतील साहित्य मराठीत आणि मराठी साहित्य अन्य भाषांत अनुवादित करण्यासाठी अनुवाद समिती स्थापन करण्याची घोषणा झाली होती. अभिजात भाषांच्या संशोधनासाठी राज्यात गुणवत्ता संशोधन केंद्र स्थापन करून केंद्र सरकारने आर्थिक मदत करण्याची मागणीही झाली होती. मात्र याबाबत वर्षभरानंतरही स्पष्टता आलेली नाही.