मुंबई : ‘काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो म्हणून आंदोलन नको,’ अशी भूमिका घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुण्यातील महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तसबीर हटविण्याच्या मुद्द्यावरून मनसेविरोधात आंदोलन करणाऱ्या भाजपच्या युवा मोर्चाच्या नेत्यांचे कान टोचले. पक्षाच्या मुंबई कार्यकारिणीच्या बैठकीत भाजयुमोच्या आंदोलनावरून झाडाझडती घेत चव्हाण यांनी आक्रमक आंदोलनाच्या राजकारणाला पक्षांतर्गतच लगाम घातला.
पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाहणीत मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसबिरीच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तसबीर लावल्यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी मोदींची तसबीर तेथून हटविली. यावर भाजयुमोने आक्रमक भूमिका घेत मनसेच्या प्रमुखांच्या निवासस्थासमोर आंदोलनाचा प्रयत्न केला. परंतु, त्या आधीच मनसे कार्यकर्त्यांनी निवासस्थानाला गराडा घालून भाजयुमोच्या कार्यकर्त्यांशी भिडण्याची तयारी केली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना माहिममध्येच रोखत भाजयुमोचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांना ताब्यात घेतले. शिवाजी पार्क येथील या आंदोलनाचा पुरता फज्जा उडत असताना दादरमध्येच शहर कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने जमलेल्या नेत्यांच्या समोर चव्हाण यांनी युवा मोर्च्या कार्यपद्धतीवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.
काल आलेल्या मुलाच्या विरोधात आपण आंदोलन करायला नको होते,’ अशा शब्दांत चव्हाण यांनी भाजयुमोच्या नेत्यांचे कान टोचले. युवा मोर्चाने अशा आंदोलनांपासून सावध राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. आम्हाला युवकांना शिक्षित करायचे आहे, गुंड तयार करायचे नाहीत, अशा शब्दांत त्यांनी पक्षाची भूमिका आणि आंदोलनाची राजकीय उपयुक्तता लक्षात घेऊन निर्णय घ्यावे, असा सल्ला तरूण नेत्यांना दिला.
तरूणांच्या मनातील राग मांडला – महाडिक
रवींद्र चव्हाण आमचे नेते आहेत. त्यांनी दिलेले मार्गदर्शन आणि आदेश आम्ही तंतोतंत पाळू,’ अशी प्रतिक्रिया भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी रवींद्र चव्हाण यांच्या नाराजीवर व्यक्त केली. तसेच मोदींची तसबीर हटविण्याच्या घटनेचे समर्थन करत तरुणांच्या संतापाला वाट करून देण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. . यापुढील आंदोलनांमध्ये ‘गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते तयार होणार नाहीत’, याची काळजी घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
