मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे प्रथमच २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी बीबीए, बीएमएस, बीसीए आणि बीबीएम अभ्यासक्रमाची सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात आली. मात्र याबाबत बहुतांश विद्यार्थ्यांना माहितीच नव्हती. त्यामुळे फक्त ४८ हजार विद्यार्थ्यांनीच ही परीक्षा दिली. त्यामुळे राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये ६० हजारांहून अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, या अभ्यासक्रमांच्या पुनर्परीक्षेबाबत सीईटी सेलकडून सरकारकडे विचारणा केली असून, त्यावर विचारविनिमय सुरू आहे. यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने बीबीए, बीएमएस, बीबीएम व बीसीए अभ्यासक्रमाची मान्यता प्रक्रिया त्यांच्या अखत्यारित आणून या अभ्यासक्रमाचे प्रवेश राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत केंद्रीय पद्धतीने घेण्याचे निर्देश सीईटी कक्षाला दिले आहेत. तसेच या अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना त्यांच्या प्रवेश क्षमतेची नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत. बीबीए, बीएमएस, बीबीएम व बीसीए या अभ्यासक्रमाच्या १ लाख ८ हजार ७४१ जागा असून, या जागांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाने एप्रिलमध्ये अर्ज मागवले. यावेळी ५६ हजार ७४८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. तर २९ मे रोजी झालेल्या परीक्षेला ४८ हजार १३५ विद्यार्थी बसले होते. परीक्षा झाल्यानंतर या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी सीईटी असल्याचे समजले. तसेच विद्यापीठांकडून या अभ्यासक्रमांचे नावेही बदलल्याचे लक्षात आले. त्यामुळे विद्यार्थी, पालक व विविध संघटनांकडून पुन्हा परीक्षा घेण्याबाबत मागणी होऊ लागली. त्यातच या अभ्यासक्रमाच्या १ लाख ८ हजार ७४१ जागांपैकी जवळपास ६० हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यार्थी व महाविद्यालयांचे होणारे नुकसान लक्षात घेत सीईटी कक्षाने यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे पनर्परीक्षेबाबतचा प्रस्ताव पाठवला असून, यावर विचारविनिमय सुरू आहे.

हेही वाचा >>>आईस्क्रीममध्ये सापडलेले बोट पुण्यातील कर्मचाऱ्याचे, ११ मे रोजी अपघातात बोट कापल्याचा दावा

निकाल जाहीर करण्याची तयारी सुरू

परीक्षा दिलेल्या ४८ हजार १३५ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याबाबत सीईटी कक्षाने तयारी सुरू केली आहे. त्यानंतर पुनर्परीक्षा झाल्यास त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्याचा विचारही सीईटी सेलकडून करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, त्यांचे हित लक्षात घेता. विद्यार्थी व पालकांच्या मागणीनुसार पुनर्परीक्षेबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. यासंदर्भात सूचना मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.- दिलीप सरदेसाई, आयुक्त, सीईटी सेल

अभ्यासक्रम – महाविद्यालये – जागा

बीबीए – ३०५ – ३२२१९

बीबीएम – २५ – १९६४

बीसीए – ४९२ – ५०१४१

बीएमएस – २४८ – २४४०९

एकूण – १०७१ – १०८७४१