येत्या वर्षात ‘लोकसत्ता’च्या संपादकीय पानांत नव्या वैविध्यपूर्ण सदरांची लयलूट

मुंबई : दैनंदिन घडामोडींची चर्चा आणि त्यावरील भाष्य नेहमीचेच, पण त्यासह विचारांना खाद्य पुरविणारे आणखीही काहीतरी हवेच. ज्याद्वारे ज्ञानाच्या कक्षा रुंदावत जातील आणि विचारश्रीमंत प्रदेशाचे पर्यटन वाचकांना करता येईल, अशा सदरांची लयलूट ‘लोकसत्ता’च्या ‘संपादकीय’ आणि ‘विचार’ पानांवर यंदाही होणार आहे.

संपादकीय पानांचा भर मराठी भाषेबद्दलची आस्था आहे, पण रहाटगाडग्यासारख्या चाललेल्या रोजरगाड्यात या भाषेचे सौंदर्य मात्र दुरावतेच आहे, ही कमतरता काही अंशाने तरी निवारण्यासाठी सज्ज झालेले ‘भाषासूत्रे’ हे नवे  सदर २०२२ मध्ये ‘लोकसत्ता’च्या ‘विचार’ पानावर असेल, ते आकाराने छोटेसेच असले तरी यास्मीन शेख (लिखित वाक्यरचना) , भानू काळे (शब्दांची व्युत्पत्ती), डॉ. माधवी वैद्य (म्हणी), डॉ. नीलिमा गुंडी (वाक्प्रचार), डॉ. निधी पटवर्धन / वैशाली कर्लेकर (पर्यायी मराठी शब्द) असे कसलेले सूत्रधार हे भाषासूत्र कथन करणार आहेत!  विनोबा भावे यांच्या गीताईसह त्यांच्या समग्र चिंतनाचा अभ्यासू, संश्लेषक आढावा घेणारे अतुल सुलाखे यांचे ‘साम्ययोग’ हे सोमवार ते शुक्रवारचे दैनंदिन सदरही आकाराने लहान असेल. अर्थातच, शब्दसंख्येपेक्षा गुणवत्तेवर ‘लोकसत्ता’च्या लेखकांचा भर अन्य सदरांतूनही दिसू शकेल.

  मेंदूचे विकार आणि त्यांवरील शस्त्रक्रिया यांचा आजवरचा प्रवास सांगणारे मेंदू शल्यचिकित्सक डॉ. जयदेव पंचवाघ यांचे सदर, तसेच राष्ट्रवाद आणि त्याचा सामाजिक आशय याविषयीचा ऊहापोह करणारे ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’चे महासंचालक रवीन्द्र माधव साठे यांचे सदर या यंदाच्या नव्या कल्पना. तर, ‘चतु:सूत्र’ या सदरात दीनदयाळ उपाध्याय यांनी ग्रथित केलेला एकात्म मानववाद, मिश्र अर्थव्यवस्थेचा नेहरूवाद, शिकून संघटित होऊन उचित संवैधानिक मार्गांनी संघर्षाची प्रेरणा देणारा आंबेडकरवाद आणि ग्रामीण भारताला केंद्रस्थानी मानणारा गांधीवाद यांचा ऊहापोह दर तीन आठवड्यांच्या खंडाने होत राहील, तो करणार आहेत (अनुक्रमे) रवीन्द्र महाजन, श्रीरंजन आवटे, सूरज येंगडे आणि तारक काटे. योगेन्द्र यादव यांचे ‘देशकाल’ हे सदर ‘लोकसत्ता’मध्ये यंदा परत येत आहे, तसेच प्रदीप रावत यांचे नवे सदर सुरू होत आहे. पहिली बाजू, लालकिल्ला, समोरच्या बाकावरून, शनिवारचे ‘अन्यथा’ हे पाक्षिक सदर या सदरांच्या जोडीने, ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीचे उपनिवासी संपादक देवेन्द्र गावंडे यांचे ‘वन जन मन’ हे जंगल, जमीन व प्रामुख्याने आदिवासी समाज यांच्या प्रश्नांचा वेध घेणारे पाक्षिक सदरही यंदा आहे. ‘बुकमार्क’ हा इंग्रजी वाचनाची कदर करणारा विभाग तसेच आठवड्यातून एक दिवस वाचकपत्रांना अधिक वाव, हे वैशिष्ट्य यंदाही पाळले जाईल. रविवारीदेखील वाचकपत्रांत खंड पडू द्यायचा नाही, असा चंग २०२२ मध्ये ‘लोकसत्ता’ने बांधला आहे!

२०२२मध्ये… नव्या वर्षात ‘लोकसत्ता’च्या नित्यवाचकांना पाच नवी सदरे आणि आठ नवे लेखक या पानांमधून भेटणार आहेत. मराठी भाषेतील सौंदर्यखुणा दाखवून देणारे, मेंदूविषयीचे ज्ञान वाढविणारे, राष्ट्रवाद आणि त्याचा सामाजिक आशय यांविषयीचा उहापोह करणारी सदरे यंदाचे खास आकर्षण असणार आहेत.