Heavy Rain in Mumbai : मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागात पाणी साचले आहे, तसेच वाहतूककोंडी झाली असून लोकलसेवा देखील ठप्प झाली आहे. दरम्यान, समुद्र किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्यामुळे मुंबईत मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. पावसाळ्यात समुद्र किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला होतो. रविवारी हा कमी दाबाचा पट्टा गुजरात, उत्तर केरळच्या किनारपट्टीवर निर्माण झाला होता. दरम्यान, जोरदार वाऱ्यांमुळे गुजरात, उत्तर केरळच्या किनारपट्टीवरील कमी दाबाचा पट्टा रविवारी सायंकाळी तीव्र झाला. त्यामुळे सायंकाळी मोठ्या प्रमाणात ढग तयार होऊन विजांच्या कडकडाटासह वादळ देखील झाले आणि त्यामुळे मुंबईत अचानक मुसळधार पाऊस कोसळला. दरम्यान, कमी दाबाचा पट्टा हा समुद्र किनारपट्टी भागातच तयार होतो. रविवारी कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे तीव्र स्वरुपाचा होता. त्यानंतर रविवारी सायंकाळी तो उत्तरेकडे तीव्र स्वरुपाचा झाला. याचाच परिणाम म्हणून मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळला. हेही वाचा. Maharashtra News Live : ठाण्यातील तीन हात नाका येथे भिंत कोसळून मोठं नुकसान दरम्यान, मुंबईत सहा तासांमध्ये ३०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वादळी वाऱ्यासह जोरदार सरींचा पाऊस झाला आहे. यामध्ये सकाळी 8 वाजेपर्यंत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सरासरी ८४ मिमी तर सांताक्रूझ केंद्रात सरासरी २६८ मिमी पावसाची नोंद झाली. संपूर्ण मुंबईत एकाचवेळी सर्व भागात सारखा पाऊस पडत नाही. काही ठिकाणी मुसळधार पाऊस असतो तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतात. यामुळे विभागानुसार पावसाच्या नोंदीत तफावत जाणवते अशी माहिती हवामान विभागाचे सुनील कांबळे यांनी दिली. हेही वाचा. मुंबई महानगरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना दुपारच्या सत्रातही सुट्टी, मुंबई महानगरपालिकेचा निर्णय मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. यामुळे कार्यालय गाठण्यासाठी कामगारवर्गाला मोठी कसरत करावी लागत आहे. लोकल उशिराने धावत असल्यामुळे दादर, वडाळा, कुर्ला या महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. दरम्यान, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.