मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरील रे रोड स्थानकातील पुलाच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण होऊन त्याचे लोकार्पणही झाले. त्यानंतर आता या पुलाच्या खर्चात फेरफार झाल्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने सुचवलेल्या बदलांमुळे प्रकल्प खर्चात वाढ झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रकल्पाच्या खर्चात १८ कोटींची वाढ झाली असून खर्च १९० कोटींवरून २०८ कोटींवर गेला आहे.

ब्रिटिश काळात बांधलेल्या रे रोडमधील ११२ वर्षे जुन्या रेल्वे पुलाचा पुर्नविकास महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमार्फत करण्यात आला आहे. राज्य सरकार आणि रेल्वे यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या या संस्थेने सदर पुलाचे काम पूर्ण केले. या पुलाच्या कामासाठीचा निधी मुंबई महापालिकेचा आहे. या पुलाच्या कामासाठी २०१९ मध्ये कंत्राट देण्यात आले होते. तेव्हा या प्रकल्पाच्या कामाचा खर्च १९० कोटी इतका होता. प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून मे २०२५ मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पणही करण्यात आले. मात्र या पुलाचा खर्च वाढल्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर ठेवला आहे.

एमआरआयडीसीएल या संस्थेने सदर कामात रेल्वे प्रशासनामार्फत सुचवलेले बदल, पोहोच रस्त्याची वाढवलेली लांबी, तसेच वाहतूक पोलिसांकडून प्राप्त सूचना यामुळे प्रकल्प खर्चात वाढ झाल्याचे म्हटले आहे. अपरिहार्य कारणास्तव प्रकल्पाच्या खर्चात वाढ करण्याची सूचना एमआरआडीसीएलने केली आहे. प्रशासकांच्या काळात या जादा कामांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली असून आता कार्योत्तर मंजुरीसाठी त्याबाबतचा प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत चर्चेसाठी आला असता अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी या प्रस्तावावरील निर्णय राखून ठेवला.