मुंबई : वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेला रे रोडचा केबल-स्टेड उड्डाणपूल वाहनांसाठी खुला होऊन १५ महिने उलटले आहेत. मात्र, या उड्डाणपुलाला रे रोड स्थानकाच्या फलाट क्रमांक १ व २ शी जोडणारा प्रस्तावित पादचारी पूल अद्याप उभारण्यात आला नाही. त्यामुळे स्थानकातून पूर्व-पश्चिम प्रवास करणाऱ्या पादचाऱ्यांसह रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. स्थानकाला वळसा घालून जावे लागत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकाजवळील गोखले उड्डाणपुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील जुन्या व धोकादायक ब्रिटिशकालीन उड्डाणपुलांच्या पुनर्बांधणीची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेने महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे (महारेल-एमआरआयडीसी) सोपवली. त्यानुसार रे रोड येथील जुन्या उड्डाणपुलाचे पाडकाम करून त्याजागी नवीन केबल-स्टेड उड्डाणपूल उभारण्यात आला. रे रोड उड्डाणपुलाच्या मूळ रेखाचित्राला १ नोव्हेंबर २०२१ रोजी मंजुरी देण्यात आली.

त्यानंतर करण्यात आलेल्या बदलांना ७ सप्टेंबर २०२२ रोजी मंजुरी देण्यात आली. नवा उड्डाणपूल १३ मे २०२५ रोजी वाहनधारकांसाठी खुला करण्यात आला. मात्र, उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू झाला असला, तरी त्याच्याशी स्थानकाचा पादचारी मार्ग जोडला न गेल्याने पादचाऱ्यांसमोरील अडचण कायम आहे.

सात फूट उंचीमुळे पादचारी पुलाशी थेट जोडणी नाही नवा उड्डाणपूल रे रोड स्थानकाच्या जागतिक वारसा वास्तूच्या प्रवेशद्वारापेक्षा जवळपास सात फूट उंच असल्याने उड्डाणपूल व स्थानकाचे प्रवेशद्वार थेट जोडता आले नाही. परिणामी, रेल्वे तिकीट कार्यालयात जाणे; तसेच पूर्वेकडून पश्चिमेकडे वा पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या पादचाऱ्यांना मोठा वळसा घालावा लागत आहे.

स्थानकातील फलाट क्रमांक १ व २ यांना जोडणारा पादचारी पूल उभारण्याचे नियोजन सुरुवातीपासूनच करण्यात आले होते. मात्र, उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतरही पादचारी पुलाच्या कामाला सुरुवात झाली नाही.

वारसा इमारतीचे पुनर्संचयित कामही रखडले

रे रोड स्थानकातील सुमारे १२० वर्षे जुन्या जागतिक वारसा इमारतीवरील तिकीट कार्यालयाच्या पुनर्बांधणीची जबाबदारीही महारेलकडे सोपवण्यात आली होती. या इमारतीच्या तुळयांची उंची वाढविणे, उड्डाणपुलाच्या बांधकामाशी सुसंगत पद्धतीने वारसा तिकीट कार्यालयाचे पुनर्संचयित काम करण्याचे नियोजन आहे. यासाठी महारेलने नवीन पादचारी पुलाचे स्वतंत्र जीएडी तयार केले. त्यात पुनर्संचयित करण्यात येणाऱ्या हेरिटेज तिकीट कार्यालयाच्या इमारतीचाही समावेश करण्यात आला. या जीएडीला १० ऑक्टोबर २०२३ रोजी मंजुरी देण्यात आली. मंजूर आराखड्यानुसार पुनर्संचयित वारसा इमारतीसह नव्या पादचारी पूल उभारणीचे नियोजन आहे.

पालिका-रेल्वेचा ५०:५० निधी; प्रत्यक्ष निधी नाही

या पादचारी पुलासाठी मुंबई महापालिका आणि मध्य रेल्वेने प्रत्येकी ५० टक्के निधी देण्याचे नियोजन केले आहे. महापालिकेकडे प्रकल्पाचे अंदाजपत्रक सादर केले असून ते मंजूरही झाले आहेत. मात्र, दोन्ही यंत्रणांकडून अद्याप निधी मंजूर वा वितरित झाला नाही, अशी माहिती महारेलद्वारे देण्यात आली.

प्राथमिक कामे पूर्ण, प्रत्यक्ष बांधकाम मात्र नाही

या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले सामान्य व्यवस्था रेखाचित्र (जीएडी) यापूर्वीच मंजूर झाले आहे. तसेच प्रत्यक्ष बांधकामापूर्वीची प्राथमिक कामेही पूर्ण करण्यात आली आहेत. यामध्ये भू-तांत्रिक पाहणी, वृक्ष प्रत्यारोपणासाठी परवानगी, वारसा विभागाचा ना-हरकत दाखला; तसेच प्रकल्पाचे अंदाजपत्रक सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे महारेलकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, निधीची उपलब्धता हा या प्रकल्पातील प्रमुख अडथळा ठरला आहे. महापालिका आणि मध्य रेल्वेने ५०:५० या प्रमाणात निधी देण्याचे नियोजन असले तरी प्रत्यक्ष निधी मंजूर किंवा वितरित झालेला नाही. त्यामुळे पादचारी पुलाच्या बांधकामाची प्रत्यक्ष सुरुवात कधी होणार, याबाबत सध्या निश्चित कालमर्यादा सांगता येत नाही.

तिकीट कार्यालयाला टाळे

पादचारी पूल आणि स्थानकाशी थेट जोडणी नसल्याचा फटका रेल्वेच्या तिकीट कार्यालयालाही बसला आहे. सध्या संबंधित वारसा इमारत बंद असून तिकीट कार्यालयाला सुरक्षा रक्षकांकडून टाळे लावण्यात आले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली असून प्रवाशांची वर्दळ कमी झाल्याने सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला