मुंबई : शिवसेनेत बंडखोरी करून महाविकास सरकार अडचणीत आणणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासह नऊ मंत्र्यांची लवकरच मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार आहे. सोमवारी या मंत्र्यांची खाती काढून घेण्यात आली. मात्र आता या सर्व मंत्र्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला असून त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच राज्यपालांना विनंतीपत्र पाठविणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंडखोरी करणाऱ्या मंत्र्यांची खाती काढून घेतल्यावर एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच मंत्र्यांनी गेल्या महिनाभरात घेतलेल्या निर्णयांच्या सर्व फायली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कायार्लयाने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यातून काही मंत्र्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे सूतोवाच मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्राने केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून गळचेपी आणि पक्ष संपविण्याचे कारस्थान होत असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या ३९ आमदारांनी सरकार विरोधात बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारमधून बाहेर पडावे आणि भाजपसोबत सरकार स्थापन करावे अशी या बंडखोरांची मागणी आहे. तर शिवसेनेकडून ही बंडखोरी मोडून काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या बंडखोरीत सहभागी झालेल्या मंत्र्यांवर कठोर कारवाई करावी, त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी आघाडीतील घटकपक्षांकडून सातत्याने होत आहे. सुरुवातीला काहींसे सबुरीचे धोरण घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता मात्र या बंडखोर मंत्र्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. बंडखोर मंत्र्यांची खाती काढून घेतल्यानंतर आता त्यांच्या कारभाराचीही चौकशी सुरू करण्याचे आदेश ठाकरे यांनी दिले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rebel ministers fired soon eknath shinde shiv sena mahavikas government trouble ysh
First published on: 29-06-2022 at 00:02 IST