मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उल्हासनगर या त्यांच्या बालेकिल्ल्यात शिवसैनिकांनी शनिवारी प्रथमच त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाला लक्ष्य केले. दुसरीकडे शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांनी नोटीस बजावल्याने कायदेशीर लढाईला तोंड फुटले. तर या बंडाला कथितरीत्या रसद पुरवणारे भाजपचे नेते अद्यापही मौनात असल्याने कोंडी झालेल्या बंडखोरांनी अपात्र ठरण्याच्या भीतीने, ‘‘आम्ही शिवसेनेतच, आमचे विचारही बाळासाहेबांचेच,’’ असा जप सुरू केला.

शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्षांला आता कायदेशीर लढाईचे स्वरूप येणार आहे. शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे केलेल्या याचिकेवरून शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली. आमदारांना सोमवापर्यंत बाजू मांडावी लागणार आहे. यावरून शिंदे आणि शिवसेनेतील वाद आता न्यायालयात जाईल असेच संकेत मिळत आहेत. शिवसेनेने आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी आधी अर्ज केल्याने त्यावरच प्रथम सुनावणी होईल. शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरू शकतात, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे. दुसऱ्या बाजूला बंडखोरांच्या विरोधात शिवसेनेने आता अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. बंडखोरांच्या विरोधात कठोर कारवाईचा निश्चय शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शनिवारी करण्यात आला. तर राज्यात ठिकठिकाणी बंडखोरांच्या विरोधात निषेध मोर्चे, फलकांना काळे फासण्याचे प्रकार लागोपाठ दुसऱ्या दिवशीही घडले. शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये शिंदेपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केली. त्यानंतर ठाण्यात शिंदे गटानेही शक्तिप्रदर्शन केले.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बंडखोरांच्या विरोधात कठोर कारवाईचे सारे अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. बंडखोरीनंतर शिवसेनेला पुन्हा नव्याने उभारी देण्याकरिता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढाकार घेणार आहेत. शिवसेना ‘हिंदुत्व आणि मराठी’ या दोन मुद्दय़ांशी प्रतारणा करणार नाही, असा ठराव करीत बंडखोरांना प्रत्युत्तर देण्यात आले. दरम्यान, आमदारांच्या सुरक्षेच्या मुद्दय़ावर शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असताना शिंदे गट काहीसा सावध झाल्याचे चित्र शनिवारी दिसले. आम्ही शिवसेनेचेच आहोत, अशी ग्वाही शिंदे गटाने दिली. शिंदे गटाच्या वतीने प्रथमच गुवाहाटीत पत्रकार परिषद घेण्यात आली. तीत ‘‘आम्ही शिवसेना सोडलेली नाही, २०१९च्या निवडणुकीतील युतीनुसार भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत यावे’’, अशी भूमिका मांडण्यात आली.

नरमाईचे कारण..

केवळ पक्षादेश डावलून विरोधात मतदान केले तरच नव्हे तर पक्षविरोधी भूमिका घेतली तरीही बंडखोर आमदार अपात्र ठरू शकतात, ही कायद्यातील तरतूद लक्षात आल्याने शिंदे गट नरमला असून त्याने शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचे टाळले आहे. पक्षाविरोधात वक्तव्य केल्यास पक्षविरोधी कारवायांप्रकरणी शिवसेना त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी करू शकते.

भाजपच्या मौनाने कोंडी

बंडखोरांचा गट भाजपशासित आसाममध्ये गुवाहाटीत पंचतारांकित हॉटेलात पुढच्या हालचालींची वाट पाहत आहे. परंतु राजकीय घडामोडी घडत असताना भाजपने अद्याप ठोस भाष्य केलेले नाही. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचा पुनरुच्चार भाजप करीत आहे. त्यामुळे बंडखोरांची कोंडी झाली आहे.

सरकार स्थापनेबाबत शिंदे-फडणवीस भेट?

गुवाहाटी : सरकार स्थापनेच्या शक्यतेवर चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुजरातमध्ये बडोद्यात शुक्रवारी रात्री उशिरा भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही त्यावेळी बडोद्यात होते, असेही सूत्रांनी सांगितले. गुवाहाटीहून खास विमानाने शिंदे यांना बडोद्यात बोलावण्यात आले होते.