करवाढीमुळे छोटय़ा व्यापाऱ्यांत नाराजी * वस्तू व सेवा कराचा फेरा

वस्तू व सेवा करप्रणालीचा (जीएसटी) चर्मोद्योग क्षेत्राबरोबर छोटय़ा उद्योगांनाही फटका बसला आहे. मुंबईतील मदनपुरा, धोबीघाट, दगळी चाळ, गॅरेज कंपाऊंड या भागात बॅगांचा व्यवसाय करणाऱ्या १२ ते १५ हजार छोटय़ा कारखान्यांपैकी ४ ते ५ हजार कारखाने वस्तू व सेवा कराबाबतचे अपुरे ज्ञान, करनोंदणीचा अभाव, यामुळे बंद झाले आहेत. परिणामी दुकानांमध्ये येणाऱ्या मालाचे प्रमाण कमी झाल्यामुळे व्यवसाय मंदावला आहे.

मदनपुरा आणि आसपासच्या भागात ५०० दुकाने आणि १२ ते १५ हजार छोटे कारखाने आहेत. यात ८० टक्के काम कामगारांकडून आणि २० टक्के यंत्राच्या साहाय्याने केले जाते. अजूनही येथील दुकानदारांमध्ये जीएसटीबाबत अज्ञान आहे. महिलांच्या बॅगेवर पूर्वी ६ टक्के कर होता तो आता १८ टक्क्य़ांपर्यंत पोहोचला आहे, यामुळे व्यवसाय मंदावला आहे, असे ‘मदनपुरा पीव्हीसी लेदर असोसिएशन’च्या कल्पेश पोरवाला यांनी सांगितले.

मदनपुराबरोबरच धारावीतील चर्मोद्योगाची हीच परिस्थिती आहे. १ जुलैपूर्वी चामडय़ाच्या वस्तूंच्या विक्रीवर १३.५ टक्के कर लावला जात होता. मात्र जीएसटी लागू झाल्यानंतर आता हा कर २८ टक्क्य़ांपर्यंत पोहोचला आहे. त्यात छोटे व्यापारी व महागडय़ा ब्रॅंडेड कंपन्या या दोघांनाही २८ टक्के जीएसटी असल्याने नाराजी आहे. कच्च्या चामडय़ावर यापूर्वी २.५ टक्के कर होता. तो आता ५ टक्क्य़ांपर्यंत पोहोचला आहे. तयार चामडय़ावरील ५ टक्के कर १२ टक्क्य़ांपर्यंत पोहोचला आहे. जीएसटीमुळे करात दुपटीने वाढ झाली आहे. चामडय़ावर लावलेल्या जीएसटीमुळे वस्तूंच्या किमती ५०० ते १००० रुपयांनी वाढल्या आहेत, असे ‘लेदर गुड्स मॅन्युफॅक्चरर असोसिएशन’चे सदस्य चंद्रकांत भोईटे यांनी सांगितले.