मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून उभारण्यात आलेल्या पहिल्या स्कायवॉकची लवकरच पुनर्बाधणी करण्यात येणार आहे. स्कायवॉकच्या वांद्रे स्थानक ते भास्कर न्यायालयादरम्यानच्या भागाची महापालिका, तर एसआरए ते कलानगर जंक्शनपर्यंतच्या भागाची एमएमआरडीए पुनर्बाधणी करणार आहे. त्यामुळे पादचारी आणि प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
रेल्वे स्थानकापासून मुख्य रस्त्यापर्यंत पोहचणे प्रवाशांना तसेच पादचाऱ्यांना सोपे व्हावे यासाठी एमएमआरडीएने स्कायवॉक प्रकल्प हाती घेतला होता. त्यानुसार पहिला स्कायवॉक कलानगर जंक्शन ते वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक दरम्यान उभारण्यात आला. २००८ मध्ये हा स्कायवॉक खुला झाला होता. एमएमआरडीएने उभारलेले सर्व स्कायवॉक पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले होते. मुंबईतील या पहिल्या स्कायवॉकचा काही भाग कलानगर ते वांद्रे-वरळी सागरी सेतू उन्नत मार्गासाठी पाडण्यात आला. दुसरीकडे भास्कर न्यायालय ते वांद्रे स्थानकदरम्यानच्या भागाची पुरती दुरवस्था झाली होती. त्यामुळे पालिकेने वांद्रे स्थानक ते भास्कर न्यायालयादरम्यानचा सध्याचा स्कायवॉक पाडून त्याची पुनर्बाधणी करण्याचा निर्णय घेतला होता. पालिकेने या भागाच्या पाडकाम आणि पुनर्बाधणीसाठी निविदा प्रक्रिया राबवून या कामाचे कंत्राट एन. ए. कन्स्ट्रक्शनला दिले आहे.
सध्या ९० टक्के पाडकाम पूर्ण झाल्याची माहिती पालिकेच्या पूल विभागातील एका अधिकाऱ्याने दिली. पाडकाम पूर्ण झाल्यानंतर स्कायवॉकच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येणार असून काम सुरू झाल्यापासून १८ महिन्यांत बांधकाम पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. एकीकडे वांद्रे स्थानक ते भास्कर न्यायालयादरम्यानच्या भागाची पुनर्बाधणी होत असताना एसआरए कार्यालयापासून कलानगर जंक्शनपर्यंतच्या भागाचे काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे आता या भागाच्या पुनर्बाधणीचे काम एमएमआरडीए करणार असल्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले आहे.