मुंबई : अधिवेशनात विक्रमी कामकाज झाले, महिला, शेतकरी यांच्यासाठी मोठय़ा योजना जाहीर करण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर, समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा या अधिवेशनातून सरकारने प्रयत्न केला, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची शुक्रवारी सांगता झाली. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रयांनी मागील अडीच वर्षांत झाले नव्हते, इतके उत्तम कामकाज या अधिवेशनात झाल्याचा दावा केला. विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या कॅगच्या अहवालात मुंबई महानरपालिकेच्या कारभाराबाबत गंभीर ताशेरे आहेत, त्यानुसार चौकशी होईल, त्यात जे अधिकारी दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या अधिवेशनात जास्तीत जास्त कामकाज करण्याचा आमचा प्रयत्न होता, त्यानुसार विधेयके, लक्षवेधी सूचना, आदी विविध आयुधांच्या माध्यमांतून वेगवेगळय़ा प्रश्नांवर, विषयांवर चांगली चर्चा झाली असे त्यांनी स्पष्ट केले.