scorecardresearch

अग्निशमन दलाची भरती प्रक्रिया करोनापूर्व काळाप्रमाणेच ;लेखी परीक्षेसाठी कामगार संघटनेचा आग्रह

मुंबई अग्निशमन दलातील अग्निशामक या पदाच्या ९१० जागांसाठीची भरती प्रक्रिया सुरू झाली असून त्यावरून पुन्हा एकदा कामगार संघटना विरुद्ध प्रशासन असा वाद सुरू झाला आहे.

मुंबई : मुंबई अग्निशमन दलातील अग्निशामक या पदाच्या ९१० जागांसाठीची भरती प्रक्रिया सुरू झाली असून त्यावरून पुन्हा एकदा कामगार संघटना विरुद्ध प्रशासन असा वाद सुरू झाला आहे. ही भरती प्रक्रिया करोनापूर्व काळाप्रमाणेच घेण्याचा प्रशासनाचा विचार असून कामगार संघटना लेखी परीक्षेसाठी आग्रही आहेत. तसेच अग्निशमन दलातील कर्मचारी व जवानांच्या पाल्यांसाठी आरक्षण असावे अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे. मात्र नियमात तशी तरतूद नसल्यामुळे प्रशासनाने ही मागणीही फेटाळली आहे.
मुंबई अग्निशमन दलातील अग्निशामक या पदासाठीची भरती प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी लेखी परीक्षा घ्यावी अशी मागणी करून शिवसेनाप्रणीत मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेना या संघटनेने विविध सूचना केल्या आहेत. लेखी परीक्षेची प्रक्रिया ही खर्चीक बाब असल्याचे सांगून प्रशासनाने ही लेखी परीक्षा टाळल्याचा आरोप संघटनेने केला आहे. तसेच संघटनेने भरती प्रक्रियेसाठी विविध सूचनांचा समावेश असलेले पत्रही लिहिले आहे. पोहण्याचे कौशल्य, वाहन चालवण्याचे कौशल्य याचे अतिरिक्त गुण द्यावेत, अग्निशमन दलाच्या जवानांच्या मुलांना आरक्षण द्यावे, उंची मर्यादा विशिष्ट असावी अशा काही अटी घालण्यात आल्या आहेत.
दरम्यान, अग्निशमन दल प्रमुख हेमंत परब यांनी याबाबत विचारले असता ते म्हणाले की, अग्निशमन दलाची जी भरती प्रक्रियेची पारंपरिक पद्धत आहे, त्यानुसारच ही भरती प्रक्रिया होणार आहे. यापूर्वी २०१७ मध्ये भरती झाली होती तशीच भरती आता होणार आहे. बारावी उत्तीर्ण इच्छुक उमेदवारांची शारीरिक तपासणी, वैद्यकीय तपासणी यांचा या प्रक्रियेत समावेश आहे. टाळेबंदी व करोनामुळे रखडलेली भरती प्रक्रिया घेताना लेखी परीक्षेचा मुद्दा पुढे आला होता. या परीक्षेसाठी साधारण हजारोंच्या संख्येने उमेदवार येतात. करोनाकाळात एवढय़ा उमेदवारांना बोलावणे शक्य नसल्यामुळे लेखी परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचा विचार होता. मात्र ही बाब खर्चीक आहे. त्यातच आता करोना आटोक्यात आला असून टाळेबंदी पूर्णत: शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे लेखी परीक्षा न घेता पारंपरिक पद्धतीने आता भरती प्रक्रिया होणार असल्याचे परब यांनी सांगितले. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांच्या पाल्यांना आरक्षण देण्याची पालिकेच्या नियमात तरतूद नाही, त्यामुळे इथेही नियमानुसारच आरक्षणाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Recruitment process fire brigade coronation union insists written test trade union administration amy

ताज्या बातम्या