मुंबई : वांद्रे शासकीय पुनर्विकास प्रकल्पांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील १२० घरांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून अ आणि ब वर्गातील अधिकाऱ्यांसाठी २ बीएचकेची घरे बांधली जाणार आहेत. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून येत्या १५ दिवसात निविदा मागविल्या जाणार आहेत. दुसरीकडे क आणि ड वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठीच्या २००० घरांचे काम संथ गतीने सुरु आहे. आता घरांच्या पूर्णत्वासाठी ऑगस्टचा मुहूर्त सांगितला जात आहे.
हेही वाचा >>> “आमच्याकडून नको ती कामं करून घेतात, आम्हाला…”, अजित पवारांचे शिंदे-फडणवीसांवर गंभीर आरोप




वांद्रे पूर्व येथे ९२ एकरवर शासकीय वसाहत वसलेली आहे. सर्व अ, ब, क आणि ड वर्गातील कर्मचाऱ्यांसाठी तेथे निवासस्थाने आहेत. या वसाहतीतील सर्व इमारती जुन्या झाल्या असून मोडकळीस आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने शासकीय वसाहतीचा पुनर्विकास हाती घेतला आहे. या पुनर्विकासांतर्गत शासकीय वसाहतीतील मोकळ्या जागेत ५१२० घरांचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २१२० घरांचे काम हाती घेण्यात आले आहे. क आणि ड श्रेणीसाठी ३८४ चौ फुटांची घरे बांधली जात आहेत. या घरांचे काम २०१९ पासून सुरु असून हे काम मार्च २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र करोना आणि कामाच्या संथ गतीमुळे अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. मार्च २०२१ चा मुहूर्त चुकल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने ऑगस्ट-सप्टेंबर २०२२ ची तारीख दिली. या कालावधीत काम पूर्ण न झाल्याने पुन्हा मार्च-एप्रिल २०२३ चा मुहूर्त दिला मात्र तोही बांधकाम विभागाने चुकवला.
हेही वाचा >>> पुणे ते नाशिक औद्योगिक महामार्ग: महामार्गाचा सविस्तर आराखडा तयार कण्यासाठी एमएसआरडीसीकडून सल्लगाराची नियुक्ती
आता या घरांच्या पूर्णत्वासाठी ऑगस्ट २०२३ ची नवीन तारीख सांगितली जात आहे. ऑगस्टपर्यंत घरे पूर्ण करून ती सामान्य प्रशासन विभागाला हस्तांतरित करण्यात येतील. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाकडून घरांचे वितरण केले जाईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. शासकीय वसाहतीतील २००० घरांचे काम सुरु असतानाच आता आणखी १२० घरांच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. अ आणि ब वर्गातील अधिकाऱ्यांसाठी ही घरे असणार असतील. घरे ८०० ते १००० चौ फुटांची आहेत. त्यांच्या कामासाठी १५ दिवसात निविदा मागविण्यात येणार आहेत. निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून कामास सुरुवात करण्याचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान ५१२० पैकी २१२० घरांचे काम मार्गी लागले असून उर्वरित ३००० घरांचे काम कधी सुरु होणार असा प्रश्न आहे. या विषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता ३००० घरांचे काम तसेच संपूर्ण वसाहतीचा पुनर्विकास दक्षिण कोरियातील द कोरियन लँड अँड हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या मदतीने केला जाणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.