मुंबई : करोना संकटातून बाहेर पडल्यानंतर राज्याची आर्थिक गाडी रुळावर येत असतानाच जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) संकलन १४ टक्के म्हणजेच तब्बल ३२०० कोटींनी घटले आहे. पावसाळय़ात तुलनेत कमी होणारे खरेदी-विक्रीचे व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मध्यंतरी भडकलेल्या तेलदरांचा फटका बसल्याचे राज्याच्या वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यात वस्तू आणि सेवा कराचे ऑगस्ट महिन्यात १८,८६३ कोटींचे संकलन झाले. जुलैमध्ये हे संकलन २२,१२९ कोटी होते. चालू आर्थिक वर्षांतील महिन्याचा आढावा घेतल्यास हे सर्वात कमी संकलन ठरले. तीन हजार कोटींपेक्षा अधिक किंवा १४ टक्के संकलन कमी होणे ही राज्याच्या दृष्टीने चिंताजनक बाब आहे.
ऑगस्टमधील संकलन घटले असले तरी राज्याची अर्थव्यवस्था उत्तम असल्याचा निर्वाळा वित्त विभागाच्या उच्चपदस्थांनी दिला. गेल्या ऑगस्ट महिन्याची (२०२१) तुलना करता यंदाच्या ऑगस्टमध्ये राष्ट्रीय पातळीवर १९ टक्के संकलनात वाढ झाली; पण त्याच वेळी महाराष्ट्राच्या संकलनात २४ टक्के वाढ झाल्याकडे या अधिकाऱ्याने लक्ष वेधले.
पावसाळय़ात आर्थिक व्यवहार किंवा खरेदी-विक्रीचे व्यवहार कमी होतात. याबरोबरच परताव्याचे प्रमाण तुलनेत कमी होते. एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारी या महिन्यांत तिमाही परतावा सादर केला जात असल्याने संकलन अधिक दिसते. परिणामी जुलैमधील संकलन अधिक होते. सप्टेंबरमध्ये सणासुदीमुळे राज्याच्या जीएसटी संकलनात वाढ होईल, असा विश्वासही या अधिकाऱ्याने व्यक्त केला.
महिनानिहाय जमा
एप्रिल २७,४९५ कोटी
मे २०,३१३ कोटी
जून २२,३४१ कोटी
जुलै २२,१२९ कोटी
ऑगस्ट १८,८६३ कोटी
महाराष्ट्र देशात आघाडीवर
देशात वस्तू आणि सेवा कराच्या संकलनात महाराष्ट्र कायमच अग्रेसर राहिले आहे. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक ९,५८३ कोटी, तमिळनाडू ८,३८६ कोटी, गुजरात ८,६८४ , उत्तर प्रदेश ६,७८१ कोटी, दिल्ली ४,३४९ कोटींचे संकलन झाले.
