अभिजीत ताम्हणे

मुंबई : ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांना ‘प्रभू’ म्हणणारे आणि त्यांच्यापेक्षा वयाने आठ वर्षांनी मोठे साहित्यिक महेश एलकुंचवार, कोलते यांच्या ‘दृक्चिंतन’ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळय़ासाठी मुंबईच्या ‘ सर ज. जी. कला महाविद्यालया’त बुधवारी संध्याकाळी आले आणि ‘मी विस्कळीत बोलेन’ असा इशारा देऊन त्यांनी केलेल्या प्रकटचिंतनातून, आजच्या कोलाहलात कलेच्या अमूर्ततत्त्वाची शुद्धता जपणारा सूरच श्रोत्यांना सापडला!

vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!

‘हल्ली टीव्ही मालिकांमुळे सगळेच दिग्गज कलावंत, थोडेफार सन्मान मिळाले की सारेच मान्यवर, या साऱ्यात मी आणि प्रभाकर दोघेच तेवढे सामान्य’ असा उपरोधिक टोलाही एलकुंचवारांनी लगावला, पण ‘नाटक मला अपुरं वाटू लागलं.. आपल्याला काय हवंय ते आपण करत नाहीयोत असं वाटू लागलं तेव्हाच पुरस्कार वगैरे मिळू लागले होते पण ते हवे होते का?आपण कलावंत आहोत, म्हणजे काय आहोत?’ असा आत्मचिंतनाचा सूर हा त्यांच्या पाऊण तासांच्या भाषणाचा षड्ज होता. या प्रश्नांची स्वप्रयोगातून सापडलेली उत्तरेही त्यांनी मांडली. ‘ हुनर असते – कौशल्य असतं – समाजमान्यता मिळते- मग अनेकजण स्थिरावतात. पण ही मान्यता वगैरे बाहेरून दिलेल्या गोष्टी आहेत’, ‘ प्रतिभा जपायची तर तपश्चर्या लागते. जगण्याचीही तपश्चर्याच’, ‘अमूर्ततेकडे जायचं झालं तर अंतर्घटापर्यंत शोष पडून निरामय, निराकार शुद्धतेची तहान लागावी लागते. त्यासाठी शुद्ध व्हावं लागेल असं वाटायला हवं’, असे सांगून, या शुद्धतेच्या शोधासाठी नकार देता यायला हवेत, हे सूत्र त्यांनी मांडले!

या भाषणानंतरची टाळय़ांची दाद, कोलते यांच्या काही कवितांना चाली लावून राम पंडित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या सुरेल सादरीकरणाच्या झालेल्या कौतुकापेक्षाही मोठी होती. ‘एलकुंचवार आणि किरण नगरकर हे दोन ध्रुव आहेत माझ्यासाठी. विचार करूनच लिहायचं, पण सहज वाचता येईल असं लिहायचं, हे त्यांच्याकडून उमगलं.. कलाविद्यार्थ्यांनी वाचावं असं वाटायचं , म्हणून मी लिहिता झालो’ अशा कोलते यांच्या मनोगतानंतर सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि कोलतेंनी घडवलेल्या पिढीचे प्रतिनिधी संतोष क्षीरसागर यांचे भाषण झाले, त्यांनी ‘कोलते अजूनही शिक्षक आहेत’ असा विचार मांडला. याचा संबंध कलाविषयक तत्त्वचिंतनाशी कसा, हे मात्र एलकुंचवार यांच्या ‘स्वत:साठी काम करत राहायचं’ या सहजचिंतनातून श्रोत्यांना उमगले. अर्थात, अनेक कला आणि अनेकपरींचे कलावंत अशा वैविध्यामुळेच कलानुभव समृद्ध होतो आणि त्याचमुळे कलाकृतीवर, कलावंतावर शिक्के मारू नयेत, असाही विचार मांडणाऱ्या एलकुंचवारांच्या भाषणातून, प्रत्येकाने आपापल्या शुद्धतेचा सूर शोधण्याची प्रेरणाही श्रोत्यांपर्यंत पोहोचत होती.

अनुनाद प्रकाशनाने अभिजात कलाकृतींच्या मूळ छायाचित्रांसह हे पुस्तक प्रकाशित केले आहे. उशिराने सुरू झालेला हा कार्यक्रम किती उत्तम झाला, याची साक्ष कलाक्षेत्रातील अनेकांच्या अथपासून इतिपर्यंतच्या उपस्थितीमुळे मिळत होती. दृश्यकलावंतांप्रमाणेच अशोक शहाणे, किशोर कदम, प्रफुल्ल शिलेदार, गणेश मतकरी, गणेश विसपुते या साहित्यिकांचाही समावेश या श्रोत्यांत होता.