मुंबई : अ‍ॅपआधारित टॅक्सीतून पाळीव कुत्र्यासह प्रवासास चालकांनी दोन वेळा मनाई केल्याने वडाळा येथील एका महिलेने उबर इंडियाविरोधात ग्राहक न्यायालयात धाव घेतली. ग्राहक न्यायालयानेही तक्रारीची दखल घेऊन कंपनीच्या व्यवस्थापकांना नोटीस बजावून या प्रकरणावर २५ जुलैपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उबर टॅक्सी चालकाच्या कृतीमुळे मानसिक छळ झाला असून त्याची भरपाई आणि कायदेशीर लढाईसाठी येणाऱ्या खर्चापोटी तक्रारदार रिमा चावला यांनी १० लाख रुपयांची मागणी केली आहे. वकील प्रशांत नायक यांच्यामार्फत चावला यांनी ही तक्रार केली.

चावला यांच्या तक्रारीनुसार त्यांनी २४ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास चेंबूर ते कल्याण प्रवासासाठी टॅक्सीसाठी नोंदणी केली. ती करताना सोबत पाळीव कुत्रा असल्याचेही त्यांनी टॅक्सीच्या चालकाला सांगितले. परंतु  कुत्र्याला टॅक्सीत प्रवेश दिला जाणार नसल्याचे चालकाने सांगितले. त्यावर चावला यांनी चालकाला कंपनीच्या पाळीव प्राण्यांसाठीच्या अनुकूल धोरणाबाबत माहिती दिली. तसेच पाळीव कुत्र्याला टॅक्सीमध्ये प्रवेश न देणे कंपनीच्या धोरणाविरोधात असल्याचेही सांगितले. त्यानंतर चालकाने त्यांच्याशी असभ्य भाषेत संवाद सुरू केला. त्यामुळे ही टॅक्सी रद्द करावी लागली आणि नव्या टॅक्सीने कल्याणला जावे लागले, असे चावला यांनी तक्रारीत म्हटले आहे.

 दुसऱ्या घटनेत, चावला यांनी ३१ मे २०२१ रोजी मध्यरात्री अडीच्या सुमारास टॅक्सीसाठी नोंदणी केली. परंतु टॅक्सी चालकाने पाळीव कुत्र्यांना टॅक्सीत प्रवेश निषिद्ध असल्याचे त्यांना सांगितले.

त्या चालकालाही चावला यांनी अशा धोरणाबाबत विचारणा केली. शिवाय टॅक्सीसाठी नोंदणी करताना सोबत पाळीव कुत्रा असल्याची माहिती दिली असताना या अटीबाबत का सांगितले नाही, असा प्रश्नही विचारला. परंतु चालकाने काहीच प्रतिसाद दिला नाही. याउलट गाडी रद्द करण्याचे शुल्क महिलेला भरावे लागले. रात्री खोळंबा झाला, असे चावला यांनी तक्रारीत म्हटले आहे. कायदेशीर नोटीस पाठवूनही उबरने त्याला काहीच प्रतिसाद न दिल्याने तक्रार करावी लागल्याचे चावला यांनी नमूद केले आहे.

खासगी वाहनात पाळीव प्राण्यांना बंदी नाही..

मुंबई किंवा राज्यात सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही खासगी वाहनांतून पाळीव प्राण्यांना नेण्यावर बंदी घालणारा कोणतेही सरकारी नियम अथवा कायदा नाही. त्यामुळे या कंपन्या सरकारी धोरणाविरोधात कृती करू शकत नाही, असा दावाही चावला यांनी तक्रारीत केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Refuse travel pet dog woman client runs court uber taxi ysh
First published on: 30-06-2022 at 00:47 IST