scorecardresearch

पोलिसांना मारहाण करणाऱ्यांस दिलासा देण्यास नकार; अपरात्री रस्त्यावर फिरणाऱ्यांची चौकशी करण्याचा पोलिसांना अधिकार

रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरणाऱ्यांची चौकशी करण्याचा पोलिसांना पूर्ण अधिकार असल्याचे निरीक्षण नोंदवत मद्यपान करून गाडी चालवणाऱ्या आणि पोलिसांनी अडवल्यानंतर मारहाण करणाऱ्याला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला.

मुंबई : रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरणाऱ्यांची चौकशी करण्याचा पोलिसांना पूर्ण अधिकार असल्याचे निरीक्षण नोंदवत मद्यपान करून गाडी चालवणाऱ्या आणि पोलिसांनी अडवल्यानंतर मारहाण करणाऱ्याला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला.
पोलिसांच्या कामात अडथळा आणणे, मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी याचिकाकर्त्यांने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यावरील कारवाईसाठी विलेपार्ले येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर २ फेब्रुवारी २०१९ रोजी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्या वेळी बंदोबस्तासाठी असलेल्या उपनिरीक्षकाने याचिकाकर्त्यांसह सात जणांवर गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांच्या आरोपानुसार, घटनेच्या दिवशी मध्यरात्री दोनच्या सुमारास तक्रारदार उपनिरीक्षकाने विलेपार्ले येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावरून जाणाऱ्या एका मोटारगाडीच्या चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने गाडी थांबवली नाही आणि तो गाडी बॅरिकेडला धडकवून पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अंधेरी पुलाजवळ अखेर त्याची गाडी थांबवली. त्या वेळी दोन वाहनांमध्ये एकूण सात जण असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पहिल्या मोटारगाडीचा चालक दारूच्या नशेत होता. त्यामुळे त्याने मद्यपान चाचणीस नकार दिला. एवढेच नव्हे, तर पोलिसांना लाच देण्याचा प्रयत्नही केला. शिवाय दोन्ही वाहनांमधील तरुणांच्या या गटाने पोलिसांबरोबरच्या वादाचे भ्रमणध्वनीवरून चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. तसेच दंडाच्या पावतीवर सही करण्यासही नकार दिला. उपनिरीक्षकाच्या तक्रारीनंतर सातही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार, पोलीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तवणूक केल्याचा आणि घटनास्थळी पाठवण्यात आलेल्या अतिरिक्त पोलिसाला मारहाण केल्याचाही आरोप ठेवण्यात आला होता.
याचिकाकर्त्यांने हा आरोप फेटाळताना आपण दुसऱ्या वाहनात बसलो होतो, असा दावा केला. तसेच मद्यपान न केल्याचाही दावा त्याने केला. मात्र गुन्हा आणि साक्षीदारांच्या जबाबाचा विचार करता पोलिसांच्या कर्तव्यात अडसर निर्माण केल्याचे आणि त्यांना मारहाण केल्याचे सकृतदर्शनी दिसून येते. त्यामुळे याचिकाकर्त्यांचा दावा या टप्प्यावर विचारात घेतला जाऊ शकत नाही. याउलट पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण केली गेली हा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे नमूद करून न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने गुन्हा रद्द करण्यास याचिकाकर्त्यांला नकार दिला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Refusing give relief those who beat the police rightthe policeinterrogate streets at night amy

ताज्या बातम्या