लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : भारतातील नोंदणीकृत वाहन परदेशातील प्रवासानंतर समुद्रमार्गे कंटेनरमधून भारतात परत आणल्यास ते परदेशातून आयात केलेले वाहन ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला. तसेच, डेनिस व्हॅनिन या रशिनय नागरिकाला त्याची महिंद्रा थार परत करण्याचे आदेश न्यायालयाने सीमाशुल्क विभागाला दिले.
ही मोटारगाडी भारतात नोंदणीकृत असून ती परदेशात खासगी वाहन म्हणून कायदेशीररित्या नेण्यात आली होती. सुरक्षिततेच्या कारणास्तव ते समुद्रामार्गे कंटेनरमधून भारतात आणले होते. परंतु, असे केल्याने त्याचे स्वरूप बदलत नाही, असेही मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने वाहनाच्या सुटकेचे आदेश देताना स्पष्ट केले. भारतात नोंदणीकृत वाहन हे आयात केलेले विदेशी वाहन नाही. तसेच, ते कंटेनरमध्ये ठेवल्याने खासगी वाहनाचे आंतरराष्ट्रीय व्यापारातील मालामध्ये रूपांतरही होत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.
प्रकरण काय?
व्हॅनिन यांनी १२ ऑगस्ट २०२२ गोव्यात महिंद्रा थार खरेदी केली होती. त्यासाठी त्यांनी वस्तू व सेवा करासह (जीएसटी) आणि रस्ता करही भरला होता. पुढे, ५ जुलै २०२४ मध्ये त्यांनी नेपाळमार्गे भारत सोडला. त्यानंतर चीन, कझाकीस्तान, रशिया, जॉर्जिया, आर्मेनिया आणि इराण प्रवासही केला. इराणमधील बंदर अब्बास येथे वाहन सुरक्षित कंटेनरमध्ये ठेवून व्हॅनिन यांनी ते समुद्रमार्गे भारतात पाठवले व १७ नोव्हेंबर रोजी ते न्हावा-शेवा बंदरात पोहोचले. वाहन परत करण्यासाठी सीमाशुल्क विभागाने प्रवेश देयक भरण्याची अट घातली. मात्र, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेला आयात-निर्यात कोड (आयईसी) किंवा जीएसटी क्रमांक व्हॅनिन यांच्याकडे नव्हता. त्यामुळे, त्यांना वाहन परत केले गेले नाही.
अशक्य अट पूर्ण करण्याची अपेक्षा कायद्याच्या तत्त्वांचे उल्लंघन
सीमाशुल्क कायद्यातील कलम ४३ (१) नुसार प्रवाशांचे सामान घेऊन जाणाऱ्या खासगी वाहनांना माल वाहतुकीसंबंधीच्या काही औपचारिकतेतून सूट आहे. वाहन भारताबाहेर नेताना ते खासगी वाहन म्हणूनच नेण्यात आले होते. त्यामुळे, अशक्य असलेली अट पूर्ण करण्याची अपेक्षा करणे हा कायद्याच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात असल्याचे निरीक्षण न्यायालयाने याचिकाकर्त्याला दिलासा देताना नोंदवले. तसेच, व्हॅनिन यांना आयईसी अथवा जीएसटी क्रमांकाविना प्रवेश देयक भरण्याची मुभा दिली. ऑनलाइन प्रक्रिया शक्य नसल्यास सीमाशुल्क विभागाने कागदोपत्री अर्ज स्वीकारावा, असे स्पष्ट करून आवश्यक हमीपत्र सादर केल्यानंतर याचिकाकर्त्याला त्याची महिद्रा थार परत करण्याचे आदेश दिले.
