मुंबई : अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरणारी संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई-मुख्य) २०२६ च्या पहिल्या सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना २७ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज नोंदणी करता येणार आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून (एनटीए) याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
२०२६-२७ या शैक्षणिक सत्रासाठी जेईई (मुख्य) परीक्षा दोन टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्पा (सत्र १) जानेवारी २०२६ मध्ये तर दुसरा टप्पा (सत्र २) एप्रिल २०२६ मध्ये होईल. पहिल्या सत्रातील परीक्षा २१ ते ३० जानेवारी २०२६ दरम्यान देशभरातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. पहिल्या सत्रातील परीक्षेसाठी एनटीएकडून नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याबरोबरच शुल्क भरून अर्ज निश्चित करता येणार आहे.
या परीक्षेसाठी केंद्राची घोषणा जानेवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. परीक्षा झाल्यानंतर परीक्षेतील उत्तरपत्रिका आणि उत्तरतालिका संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. या परीक्षेचा निकाल १२ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती http://www.nta.ac.in आणि https://jeemain.nta.nic.in या संकेतस्थळांवर उपलब्ध करण्यात आली आहे. पहिल्या सत्रासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या सत्रासाठी नंतर स्वतंत्रपणे नोंदणी करण्याची संधी दिली जाईल.
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने २०१९ पासून या परीक्षेची जबाबदारी एनटीएकडे सोपवली आहे. जेईई (मुख्य) परीक्षेचे दोन पेपर होणार असून, पेपर १ अंतर्गत बी.ई.-बी.टेक. अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. या गुणांवरूनच राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी), भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी), भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) आणि इतर केंद्र पुरस्कृत तांत्रिक संस्थांमध्ये प्रवेश होतो. पेपर २ अंतर्गत देशभरातील बी.आर्क आणि बी.प्लॅनिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते.
१३ भाषांमध्ये होणार परीक्षा
परीक्षा इंग्रजीसह हिंदी, मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम्, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू अशा १३ भाषांमध्ये घेण्यात येणार आहे.
