मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र (पीसीबी गट) या गटाच्या घेण्यात आलेल्या परीक्षेतील प्रश्न, दिलेले पर्याय याबाबत विद्यार्थ्यांना त्यांच्या तक्रारी व हरकती १९ मेपासून नोंदविता येणार आहेत. यामुळे चुकीचा प्रश्न किंवा पर्याय यांबाबत विद्यार्थ्यांची शंका दूर होण्यास मदत होणार आहे.
सीईटी कक्षाकडून ९ ते १८ एप्रिलदरम्यान पीसीबी गटाची परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा १६८ केंद्रांवर पार पडली. या परीक्षेला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका, देण्यात आलेले पर्याय याबाबत काही शंका असल्यास त्याविरोधात तक्रार व आक्षेप नोंदविण्याची सुविधा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने उपलब्ध केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात एखाद्या प्रश्नाबाबत किंवा पर्यायाबाबत शंका असल्यास ती दूर करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांना १९ ते २१ मे दरम्यान प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाविरुद्ध आक्षेप नोंदविता येणार आहे.
आक्षेप नोंदविण्यासाठी प्रतिप्रश्न हजार रुपये शुल्क
आक्षेप नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रति प्रश्न एक हजार रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. हे शुल्क विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने लॉगिनद्वारे भरावे लागणार आहेत. आक्षेप नोंदविण्यासाठी भरण्यात येणारे शुल्क परत मिळणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले.