मुंबई: विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण विभागाच्या पदवीधर तसेच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणी कार्यक्रम ३० सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर या पहिल्या टप्प्यात तर दुसऱ्या टप्प्यात २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर२०२३ पर्यंत मतदार नोंदणी केली जाईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
जुलै २०२४ मध्ये मुदत संपणाऱ्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांत ही मतदार नोंदणी होणार आहे. पदवीधर मतदारंसघासाठी त्या त्या मतदारसंघातील रहिवासी असलेले आणि १ नोव्हेंबर २०२३ च्या किमान ३ वर्षे आधी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेली व्यक्ती पदवीधरसाठी मतदार म्हणून पात्र ठरेल. शिक्षक मतदारसंघासाठी त्या त्या मतदारसंघातील सर्वसाधारण निवासी असलेले आणि १ नोव्हेंबर २०२३ पूर्वी लगतच्या सहा वर्षांमध्ये किमान तीन वर्षे माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शैक्षणिक संस्थेत शिक्षक म्हणून काम केलेली व्यक्ती मतदार नोंदणीस पात्र ठरेल, असेही देशपांडे यांनी सांगितले.



