मुंबई : शीना बोरा हत्याकांडाशी संबंधित खटल्याचे कामकाज येत्या सोमवारपासून (१० मार्च) पुन्हा सुरू होणार असून खटल्याची नियमित सुनावणी घेतली जाणार आहे. खटल्याचे कामकाज पाहणाऱ्या विशेष सीबीआय न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बदलीमुळे या खटल्याची मागील चार महिन्यांपासून सुनावणी होऊ शकली नव्हती.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, येत्या सोमवारपासून या खटल्याची नियमित सुनावणी घेण्यात येईल, असे विशेष सीबीआय न्यायालयाचे नवनियुक्त न्यायाधीश जे. पी. दरेकर यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. या खटल्यावर शेवटची सुनावणी गेल्यावर्षी २३ ऑक्टोबर रोजी तत्कालीन विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. नाईक निंबाळकर यांची बदली होण्यापूर्वी झाली होती. शीनाची आई इंद्राणी मुखर्जी ही या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तिच्यासह तीन जणांवर खटला चालवण्यात येत आहे. तर, इंद्राणी हिचा चालक श्यामवर राय याला या प्रकरणी माफीचा साक्षीदार करण्यात आले आहे.
शीना हिची २०१२ मध्ये इंद्राणी हिने तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि चालक याच्या साथीने हत्या केली व तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली, असा सीबीआयचा आरोप आहे, शस्त्रास्त्र बाळगण्याच्या प्रकरणात राय याला अटक करण्यात आल्यावर शीना हत्याकांडाचा उलगडा झाला होता. इंदाणीसह तिचा दुसरा पती खन्ना आणि तिसरा पती पीटर मुखर्जी यांच्यावर खटला चालवण्यात येत असून तिघेही सध्या जामिनावर बाहेर आहेत. सर्व आरोपींवर आरोप निश्चित झाल्यानंतर फेब्रुवारी २०१७ मध्ये या खटल्याला सुरुवात झाली. या प्रकरणी एकूण २३७ साक्षीदार असून ९० हून अधिक साक्षीदारांची न्यायालयाने साक्ष नोंदवली आहे.