मुंबई : पुढील आठवड्यात प्रसिद्ध होणाऱ्या अभिनेता शाहिद कपूर अभिनित ‘ओ रोमियो’ चित्रपटाचे प्रदर्शन अडचणीत येण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी हुसेन उस्तारा नावाच्या कथित गुंडाच्या मुलीने सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. उस्ताराच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणी ६ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
दाऊद इब्राहिम याचा कट्टर वैरी अशी ओळख असलेला हुसेन उस्तारा याची मुलगी सनोबर शेख हिने चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियादवाला आणि विशाल भारद्वाज यांच्याविरुद्ध दावा दाखल केला आहे. हा चित्रपट हुसैन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित असून झैदी यांनाही दाव्यात प्रतिवादी करण्यात आले आहे. तसेच, चित्रपटाचे पूर्व-प्रदर्शन करण्याची आणि न्यायालयात अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयीन आयुक्तांची किंवा इतर कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती करण्याची मागणी शेख हिने न्यायालयाकडे केली आहे.
वडिलांच्या व्यक्तिरेखेचे चुकीचे चित्रण
आपले वडील मुंबईत पत्रकार म्हणून काम करत होते आणि त्यांनी पोलीस व गुप्तचर विभाग यांसारख्या विविध सरकारी संस्थांना संपूर्ण भारतभर, विशेषतः मुंबईत गुन्हे रोखण्यासाठी मदत केली होती. या कामांमुळे त्यांच्या जीवाला सतत धोका होता, याच कारणास्तव त्यांनी पोलीस आयुक्तांकडे बुलेट-प्रूफ जॅकेटसाठी अर्ज केला होता आणि त्यानंतर त्यांची विनंती मंजूर केल्याचे पत्र त्यांना ४ ऑगस्ट १९९४ रोजी पोलीस आयुक्त कार्यालयाकडून पाठवण्यात आले. याशिवाय, आपल्या वडिलांनी दाऊदच्या डी-कंपनीला उघडपणे आव्हान दिले होते आणि त्या टोळीचे सदस्य त्यांना त्यांच्यासाठी एक धोकादायक व्यक्ती मानत होते, दाऊदच्या टोळीला आपल्या वडिलांमुळे धोका होता. त्यामुळेच, दाऊदच्या जवळच्या साथीदारांनी त्यांचा खून केला. त्यात कुख्यात गुंड छोटा शकील याचा समावेश होता. आपले वडील मुंबई पोलिसांसाठी खबऱ्या म्हणूनही काम करत होते आणि दाऊदच्या टोळीची गुप्त माहिती त्यांना पुरवत होते. तथापि, चित्रपटाच्या ट्रेलरवरून उस्तारा एक गुंड होता हे प्रतीत होत असून चुकीचे चित्रण असलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांवर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा दावा शेख हिने केला आहे.
चकमकफेम प्रदीप शर्माचाही दाखला
मुंबई पोलिसांचे माजी चकमकफेम अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या समाजमाध्यमावरील मुलाखतींचा संदर्भ देखील शेख हिने तिच्या दाव्यात दिला आहे. संबंधित चित्रपट काल्पनिक म्हणून चित्रित केला गेला असला तरी, त्याची मूळ कथा हुसेन उस्तारा यांच्या वास्तविक जीवनावर आधारित असल्याचे शर्मा यांनी मुलाखतीत म्हटल्याकडे शेख हिने लक्ष वेधले आहे. उस्तारा हा पोलिसांचा खबऱ्या होता, असेही शर्मा यांनी नमूद केल्याचा दावा तिने केला आहे.

