scorecardresearch

बाजार अस्थिरतेच्या काळात भरवशाचा गुंतवणूक मार्ग; ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ वार्षिकांकाचे प्रकाशन व परिसंवाद

जगावरील युद्धजन्य अनिश्चितता, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेल, धातू आणि अन्य महत्त्वाच्या जिनसांचा किंमत भडका आणि देशांतर्गत महागाईचा चढत असलेला पारा अशा अस्थिर स्थितीत गुंतवणूक कशी आणि कुठे करावी, याचे मार्गदर्शन मंगळवार, २२ मार्चला गुंतवणूकदार जागराच्या कार्यक्रमातून केले जाणार आहे.

मुंबई : जगावरील युद्धजन्य अनिश्चितता, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेल, धातू आणि अन्य महत्त्वाच्या जिनसांचा किंमत भडका आणि देशांतर्गत महागाईचा चढत असलेला पारा अशा अस्थिर स्थितीत गुंतवणूक कशी आणि कुठे करावी, याचे मार्गदर्शन मंगळवार, २२ मार्चला गुंतवणूकदार जागराच्या कार्यक्रमातून केले जाणार आहे. नवीन आर्थिक वर्षांत आर्थिक नियोजनाची घडी बसवून देणाऱ्या ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ या वार्षिकांकाचे प्रकाशनही या निमित्ताने होणार आहे. या विशेषांकाच्या प्रकाशनाचे यंदाचे हे सलग नववे वर्ष आहे.

आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड प्रायोजित आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. सह-प्रायोजक असलेला ‘लोकसत्ता-अर्थब्रह्म’ हा गुंतवणूकदार मार्गदर्शनपर उपक्रम मंगळवारी, २२ मार्चला सायंकाळी ६ वाजता स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम) येथे होत आहे. या निमित्ताने गुंतवणूकदारांना सहभागी तज्ज्ञांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या मनांतील प्रश्न विचारण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

तेलाच्या भडक्याने तापलेली महागाई आणि घटणारे व्याजाचे दर असे सर्वसामान्यांपुढे दुहेरी संकट उभे राहिले आहे. अशा स्थितीत पैशाने पैसा वाढवायचा तर गुंतवणूक करावीच लागेल आणि पैसा गुंतवायचा तर कमी-जास्त का असेना जोखीम घ्यावीच लागेल. महिन्याकाठी खर्च वजा जाता गाठीशी राहणारा पैसा वेगवेगळय़ा गुंतवणूक पर्यायांमध्ये विभागून जोखमीलाही टाळणाऱ्या गुंतवणुकीचे वेगवेगळय़ा वाटांचे दिशादर्शन म्हणून हा परिसंवाद गुंतवणूकदारांना निश्चित मदतकारक ठरेल.

या परिसंवादात ‘समभाग गुंतवणुकीतून संपत्ती निर्मिती’ या विषयावर स्तंभलेखक आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीचे अभ्यासक अजय वाळिंबे, ‘गुंतवणुकीला निर्धोक बनविणारे मालमत्ता विभाजन’ यावर अर्थ-अभ्यासक व वित्तीय नियोजनकार कौस्तुभ जोशी, तर ‘गुंतवणुकीतून करावयाचे कर नियोजन’ या विषयावर सनदी लेखापाल आणि कर-सल्लागार प्रवीण देशपांडे हे तज्ज्ञ वक्ते मार्गदर्शन करतील.

गुंतवणुकीच्या दिशादर्शनाचे नववे वर्ष..

गुंतवणूकदारांच्या मनात डोकावणाऱ्या सर्व शंका, कुशंका, धोके, फायदे तसेच विविध योजना आणि पर्यायांसह अनेक विषयांची सखोल माहिती देणारा ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ सलग नवव्या वर्षी प्रकाशित होत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर काही दिवसांतच, नवीन आर्थिक वर्षांसाठी गुंतवणूकदारांना सजग आणि सज्ज करणाऱ्या या विशेष वार्षिकांकाचे आजवर नेहमीच स्वागत होत आले आहे. अर्थसंकल्पीय तरतुदी आणि बदलती बाजार स्थिती यातून गुंतवणुकीला आवश्यक ठरणारे नवीन वळण आणि त्या बद्दलचे मार्गदर्शन हे यंदाच्या अंकाचेही वैशिष्टय़ आहे.

महागाईचा पारा चढतच जाणार आहे, जीवनमान खर्चीक तर पारंपरिक व्याजावर आधारित लाभ घटत जाणार आहेत. अशात खर्च, उत्पन्न आणि गुंतवणुकीचा ताळमेळ कसा जुळवावा, महागाईला मात देणारा आदर्श पोर्टफोलिओ कसा सांभाळावा, नववर्षांरंभापासून अस्थिर बनलेल्या शेअर बाजारात गुंतवणूक करताना घ्यावयाची खबरदारी, म्युच्युअल फंड आजही सहीह्णच कसे? सोन्यात स्मार्ट गुंतवणूक कशी? रोखे बाजारात गुंतवणूक का करावी, या बरोबरीनेच जेन नेक्स्टह्णने जपावयाचे अर्थभान, गुंतवणुकीचे नवखे आणि हटकेह्ण मार्ग आणि आगामी संपत्ती निर्माते वगैरे ऐवजासह हा नवीन अंक आपल्यापुढे आला आहे.

  •   विषय : बाजार अस्थिरतेत गुंतवणूक कशी आणि कुठे?
  •   कधी : मंगळवार, २२ मार्च २०२२
  •   वेळ : सायंकाळी ६ वाजता
  •   स्थळ : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क, दादर(प.)

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Reliable investment path times market volatility publication seminar lok satta arthabrahm ysh

ताज्या बातम्या