शिवसेना-काँग्रेस कार्यकर्त्यांनी काम रोखले; कंपनीविरोधात तक्रार दाखल

चिराबाजार येथील चंदनवाडीतील जगन्नाथ (नाना) शंकरशेठ हिंदू स्मशानभूमीमधील लहान मुलांच्या दफनभूमीमध्येच रिलायन्स जिओ कंपनीने बुधवारी रात्री ‘फोर-जी’ टॉवरच्या बांधकामास सुरुवात केली होती. मात्र स्थानिक शिवसैनिकांनी स्मशानभूमीत धाव घेत हे काम बंद पाडले. गुरुवारी सकाळी पुन्हा या कामाला सुरुवात होताच काँग्रेस नगरसेवकांनीही स्मशानात धाव घेतली आणि बांधकाम रोखून धरले. या प्रकरणी कंपनीविरुद्ध पोलिसात तक्रारही करण्यात आली आहे.

मोकळ्या जागा, उद्याने, मैदाने आदी ठिकाणी पालिकेने रिलायन्स जिओ कंपनीला ‘फोर-जी’चे टॉवर उभारण्यास परवानगी दिली आहे. मात्र या कंपनीने बुधवारी रात्री या स्मशानभूमीमध्येच ‘फोर-जी’ टॉवर उभारण्यास सुरुवात केली होती. स्मशानभूमीतील संरक्षक भिंत पाडण्यात आली आणि टॉवरचे साहित्यही तेथे आणण्यात आले. त्याची माहिती मिळताच शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ आणि चंदनवाडी गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यांनी तेथे धाव घेत काम बंद पाडले. रात्री उशीरा शिवसैनिक निघून गेल्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात झाली. परंतु काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांना त्याची माहिती मिळाली आणि ते कार्यकर्त्यांसोबत स्मशानभूमीत पोहोचले. त्यांनीही हे काम बंद पाडले. पालिकेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी गुरुवारी स्मशानभूमीत जाऊन पाहणी केली. त्यानंतर पालिका आयुक्त अजय मेहता यांची त्यांनी भेट घेतली आणि हे काम त्वरित थांबविण्याची मागणी केली. या प्रकरणी भाजपचे आमदार राज के. पुरोहित आणि काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून बांधकामासाठी आणलेली यंत्रे हस्तगत केली.

उद्याने, मैदानांपाठोपाठ रिलायन्स जिओने स्मशानांकडे आपला मोर्चा वळविल्याने नागरिकांमध्येही संतापाचे वातावरण आहे. ‘फोर-जी’चे टॉवर स्मशानात उभारण्याचा अट्टाहास रिलायन्स जिओने सोडून द्यावा अन्यथा रिलायन्स जिओचा एकही टॉवर मुंबईत उभा राहणार नाही, असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. पालिका प्रशासनाने रिलायन्सला मुंबईत ‘फोर-जी’ टॉवर उभारण्यासाठी दिलेली परवानगी तात्काळ रद्द करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

रिलायन्स कंपनीशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी कोणत्याही प्रतिक्रियेस नकार दिला.