मुंबईत तुफान पाऊस पडला आहे. सहा तासांमध्ये ३०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना पावसाचा फटका बसला आहेच. पण आमदार आणि मंत्रीही त्यातून सुटलेले नाही. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील रेल्वे ट्रॅकवरुन चालत निघाले. सकाळी पावणेदहाच्या दरम्यान या दोघांनीही चालत प्रवास सुरु केला. त्यानंतर पुढे उभी असलेली ट्रेन गाठली आणि त्यानंतर अधिवेशनात पोहचले. सामान्य नागरिकांप्रमाणेच मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांना पावसाचा फटका बसला आहे. काय म्हणाले आहेत अमोल मिटकरी? आम्ही दोनचार आमदार आणि मंत्री अनिल पाटील चालत निघालो आहोत. दादर आणि कुर्ला स्टेशनच्या मध्ये मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील मी, तसंच काही आमदार ट्रेनमध्ये अडकले आहेत. पावसामुळे सगळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाचा हा अंतिम आठवडा आहे त्यासाठी आम्ही जात आहोत. या अधिवेशनात जाताना आमचे हाल झाले आहेत. लवकरच वाहतूक पूर्ववत होईल अशी आशा आहे. सामान्य लोकांनाही याचा फटका बसला आहे. अमोल मिटकरी आणि अनिल पाटील यांची पायपीट विधानसभा अध्यक्ष हे परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. दोन दिवसांची सुट्टी असल्याने बहुतांश आमदार हे दोन दिवसांसाठी आपल्या आपल्या मतदारसंघात गेले होते. सोमवारी म्हणजेच आज अधिवेशन असल्याने अनेक आमदार रेल्वेने मुंबईत पोहचण्यासाठी निघाले. महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्येही काही आमदार अडकले आहेत. बाहेरुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस मधेच थांबल्याने मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, तसंच अमोल मिटकरी यांची रेल्वे ट्रॅकवरुन पायपीट झाली. संजय बनसोडेही लातूरहून मुंबईकडे येणाऱ्या ट्रेमध्ये खोळंबले. महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये मंत्री हसन मुश्रीफ आहेत ज्यांना पोहचण्यासाठी विलंब होतो आहे.आमदार आणि मंत्र्यांची अनुपस्थिती पाहता आजचं काम कसं होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं महत्त्वाचं आवाहन मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे मार्गावरील वाहतूकही बाधित झाली आहे. ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मी दिले आहेत. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन मी करत आहे.