औषध प्रतिरोधी क्षयरुग्णांना दिलासा

सध्या ‘एमडीआर’ क्षयरोगी आणि एक्सडीआर क्षयरोगींना दिवसाला जवळपास १३ गोळ्या घ्याव्या लागतात.

‘एम बीपाल’ नवी औषधपद्धती; मुंबईसह देशभरात वैद्यकीय चाचण्या

मुंबई : औषध प्रतिरोधी ‘एमडीआर ’आणि ‘एक्सडीआर’ क्षयरुग्णांसाठी ‘एम बीपाल’ अशी नवी उपचार पद्धती विकसित केली असून त्याच्या तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या मुंबईसह देशभरात सुरू होत आहेत. देशभरातील नऊ केंद्रापैकी मुंबईच्या गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात प्रथम या चाचण्या सुरू झाल्या असून दोन रुग्णांची नोंद झाली आहे.

क्षयरोगामध्ये दिल्या जाणाऱ्या औषधांना प्रतिरोध निर्माण झालेल्या रुग्णांमध्ये उपलब्ध उपचार पद्धती ही अयशस्वी ठरत असल्याचे आढळत आहे. अशा रुग्णांवर एम-बीपाल या नव्या थेरपीचा वापर दक्षिण आफ्रिकेत प्रभावी असल्याचे आढळले आहे. त्यामुळे याचा वापर आता भारतातही करण्यात येणार असून याच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या केल्या जात आहेत. याअंतर्गत भारतातील नऊ केंद्रांची निवड करण्यात आली आहे. यात मुंबईतील गोवंडीचे शताब्दी रुग्णालय, सर्वोदय रुग्णालय यासह लखनऊ, आग्रा, अहमदाबाद, दिल्ली, मदुराई येथील रुग्णालयांचा समावेश आहे.

भारतात प्रथमच मुंबईतील गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात सोमवारपासून या चाचण्या सुरू झाल्या आहेत. या अंतर्गत उपचार पद्धती अयशस्वी ठरलेल्या एमडीआर क्षयरोग आणि एक्सडीआर क्षयरोग होण्याच्या मार्गावरील रुग्णांवर ही चाचणी सुरू केली आहे.

औषध प्रतिरोधी क्षयरोगाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून सध्या दर दोन मिनिटत तीन रुग्णांचा मृत्यू होतो. त्यामुळे यावर उपाय शोधणे अधिक गरजेचे आहे. देशभरात नऊ केंद्रांवरील ४०० रुग्णांवर याची चाचणी केली जाणार असून मुंबईतील दोन्ही केंद्रांवरील प्रत्येकी ५० रुग्णांचा यात समावेश केला जाणार आहे. भारतात प्रथम शताब्दी रुग्णालयात या चाचण्या सुरू झाल्या असून लवकर सर्वोदय रुग्णालयातही सुरू केल्या जातील, असे पालिकेच्या क्षयरोग विभागाच्या प्रमुख डॉ. प्रणिता टिपरे यांनी सांगितले.

‘एम बीपाल’चे फायदे

सध्या ‘एमडीआर’ क्षयरोगी आणि एक्सडीआर क्षयरोगींना दिवसाला जवळपास १३ गोळ्या घ्याव्या लागतात. तसेच सध्याच्या उपचार पद्धतीचा कालावधी १८ ते २४ महिने आहे. त्यामुळे त्याचे दुष्परिणामही खूप तीव्र आहेत. परिणामी रुग्ण कंटाळून उपचार सोडून देण्याचे प्रमाणही अधिक आहे. एम बीपाल उपचार पद्धतीमध्ये केवळ तीनच गोळ्या घ्याव्या लागणार आहेत. तसेच या उपचार पद्धतीचा कालावधीही सहा महिन्यांचा आहे. औषधांची संख्या कमी आणि दुष्परिणामही तुलनेने कमी असल्यामुळे रुग्ण ही उपचार पद्धती पूर्ण करण्याची शक्यता अधिक आहे. एक्सडीआर पातळी गाठण्याच्या मार्गावर असलेल्या रुग्णांमध्ये सध्याची उपचारपद्धती ४२ टक्केच प्रभावी आहे. दक्षिण आफ्रिकेत एम बीपाल थेरपी अशा रुग्णांवर ९३ टक्के तर उपचार पद्धती अयशस्वी झालेल्या एमडीआर क्षयरोगींसाठी ९१ टक्के प्रभावशाली असल्याचे आढळले आहे, त्यामुळे ही उपचार पद्धती या रुग्णांसाठी नवी आशा असल्याचे शताब्दी रुग्णालयातील बीपाल चाचणीचे मुख्य अन्वेषक डॉ. विकास ओसवाल यांनी सांगितले.

कोणत्या रुग्णांसाठी?

उपचार पद्धती अयशस्वी झालेल्या एमडीआर आणि एक्सडीआर होण्याच्या मार्गावर असलेल्या रुग्णांचा या नव्या थेरपीमध्ये समावेश करण्यात येणार आहे. १८ वर्षांवरील रुग्णांसाठी ही थेरपी असून यामध्येही रुग्णांची तपासणी करूनच थेरपी देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. मुंबईतील दोन केंद्रांचा यात समावेश असला तरी राज्यभरातील रुग्णांनाही यामध्ये सहभागी होता येणार आहे. परंतु यासाठी सहा महिने सातत्याने या रुग्णांना तपासणीसाठी मुंबईत येणे आवश्यक आहे. नवी थेरपी असल्यामुळे आठवड्यातून एकदा या रुग्णांची तपासणी केली जाणार आहे, असे डॉ. ओसवाल यांनी सांगितले. देशभरात आढळणाऱ्या एकूण एमडीआर रुग्णांपैकी राज्यात १९ टक्के राज्यातील ५२ टक्के एमडीआर रुग्ण मुंबईत उपचारावर असलेल्या एमडीआर रुग्णांची संख्या

‘एम बीपाल’ म्हणजे काय?

एम बीपालअंतर्गत बेडाक्युलीन, प्रिटोमनाईड आणि लिनॅझोलिड या तीन औषधांचा समावेश केलेला आहे. यातील प्रिटोमनाईड औषधाचा वापर भारतात प्रथमच केला जाणार आहे. या थेरपीचा कालावधी सहा महिन्यांचा असेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Relief for drug resistant tuberculosis patients akp

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या