मुंबई : निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांवर प्रभाव टाकताना उमेदवार किंवा राजकीय नेत्यांकडून केली जाणारी धार्मिक, प्रांतिक, भाषिक वक्तव्ये हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे. मात्र त्याबाबत आयोगाकडे कोणीही तक्रार केलेली नाही. तरीही आयोगाने स्वत:हून यात लक्ष घालत मुंबई महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागविल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्यात असून मतदारांना आपलेसे करण्यासाठी राजकीय पक्षांकडून आश्वासनांची खैरात केली जात आहे. जाहीरनाम्यांच्या माध्यमातून मतदारांना विविध आश्वासने देतानाच प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ही निवडणूक धार्मिक, प्रांतीय, भाषिक मुद्द्याकडे वळविण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांकडून केला जात आहे. त्यातूनच मुंबईचा महापौर हिंदू, मराठी, उत्तर भारतीय, गुजराती होणार असल्याचा दावा करीत राजकीय पक्षांकडून त्या त्या भाषिक, प्रांतिक, धार्मिक मतदारांवर प्रभाव पाडला जात आहे. मुंबईचा महापौर हा मराठी आणि हिंदूच होणार, अशी सार्वत्रिक वक्तव्ये भाजप नेत्यांकडून केली जात आहेत.

तक्रारीची प्रतीक्षाप्रचारात धार्मिक, प्रांतीय वक्तव्ये हा आदर्श आचारसंहितेचा भंगच आहे. निवडणुका सौदार्हपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी उमेदवार आणि राजकीय नेत्यांनीही प्रचारात धार्मिक, भाषिक, प्रांतीय द्वेष पसरवणारी वक्तव्ये टाळायला हवीत. मात्र उमेदवार किंवा नेत्यांच्या प्रक्षोभक वक्तव्यांबाबत आयोगाकडे अद्याप कोणीही तक्रार केलेली नाही. मुंबईचा महापौर मराठी, हिंदू, गुजराती अशा वाद्ग्रस्त वक्तव्यांबाबत कोणी तक्रार केल्यास त्याची गंभीर दखल घेऊन आयोग कारवाई करू शकतो. परंतु कोणीही तक्रार केली नसली तरी मुंबईत कोणी कोणी धार्मिक, भाषिक, प्रांतीय द्वेष पसरविणारी वक्तव्ये केली आहेत, याबाबत पालिका आयुक्तांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. या अहवालानंतर आयोग पुढील निर्णय घेईल, असे दिनेश वाघमारे यांनी सांगितले.