पेणजवळील गागोदे खुर्दच्या जंगलात मिळालेले मानवी अवशेष हे शीना बोराचेच असल्याचा अहवाल दिल्लीतील एम्समधील न्यायवैद्यक विभागाने दिला आहे. शीना बोरा हत्याकांड प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आल्यानंतर एम्समधील न्यायवैद्यक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गागोदे खुर्दमध्ये सापडलेल्या मानवी अवशेषांचे नमुने घेतले होते. त्यावरील चाचण्यांनंतर हे अवशेष शीना बोराचेच असल्याचा अहवाल सीबीआयकडे देण्यात आला.
न्यायवैद्यक विभागाच्या अहवालानंतर आता सीबीआय या प्रकरणी तीन आरोपींविरूद्ध लवकरच आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि शीना बोरा हिची आई इंद्राणी मुखर्जी, इंद्राणी मुखर्जीचे दुसरे पती संजीव खन्ना आणि तिचा वाहनचालक श्यामवर राय यांना मुंबई पोलिसांनीच अटक केली होती. हे सर्व सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
गुन्हेगारी दंडसंहितेनुसार अटक केल्यानंतर ९० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करणे आवश्यक असते. तसे केले नाही, तर आरोपी जामीन मिळण्यास पात्र ठरतात. त्यामुळे येत्या काही दिवसांतच आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात येईल.