मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठुरायाला आळवणाऱ्या अभंगरचना सादर करत प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांनी तमाम रसिकांची मने जिंकली. पंढरपूरला निघालेल्या वारीतील वारकऱ्यांची विठ्ठल भेटीची आस एकीकडे टिपेला पोहोचलेली असतानाच मुंबईत झालेल्या ‘अभंगवारी’ या कार्यक्रमात अभंगांच्या सरीत श्रोते न्हाऊन निघाले.
गायक राहुल देशपांडे यांच्या ‘वसंतोत्सव’ या कल्पनेअंतर्गत ‘अभंगवारी’ हा अभंग व भक्तीगीतांचा कार्यक्रम भारतातील अकरा शहरांतून आयोजित केला जात आहे. त्याअंतर्गत मुंबईत नुकताच ‘अभंगवारी’ हा कार्यक्रम श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभाहगृहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रायोजक सुगी ग्रुपचे निशांत देशमुख यांनी कला व सांस्कृतिक अभिरुची जपण्याच्या व संवर्धनाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ‘अभंगवारी’चे आयोजन करण्यात आले होते, असे सांगितले.
विठ्ठलाच्या गजराने कार्यक्रमाची सुरुवात करीत ‘सुंदर ते ध्यान’, ‘पंढरीचा वास’, ‘वैष्णवांचा जथा’ यांसारखे अभंग, संतश्रेष्ठ तुकाराम, नामदेव आदींचे अभंग आणि भक्तीगीते सादर करत राहुल देशपांडे यांनी रसिकांना आध्यात्मिक अनुभूती दिली. या अभंगवारीच्या अंतिम चरणी ‘कानडा राजा पंढरीचा’ हा अभंग गात विठ्ठलाच्या नामगजरात या अनोख्या भक्तीसंगीत मैफिलीचा समारोप त्यांनी केला.