मुंबई : नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वीच गरबा आणि दांडिया कार्यक्रमांभोवती वादांची मालिका सुरू झाली आहे. आता ‘रेन्ट अ गरबा पार्टनर’ या जाहिरातींनी त्यात आणखी एका वादाची भर पडली आहे. पैसे घेऊन गरबा खेळण्यासाठी ‘पार्टनर’ उपलब्ध करून देण्याच्या जाहिराती समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. त्यात ‘फोरहेड किस’ आणि ‘मिस्ट्री फेवर’ सारख्या वैयक्तिक स्वरूपाच्या सेवांचाही उल्लेख करण्यात आला आहे. या जाहिरातींच्या पार्श्वभूमीवर महिलांची फसवणूक, गैरव्यवहार किंवा अनैतिक प्रकार होण्याची शक्यता व्यक्त करत भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे.
नवरात्रोत्सवातील गरबा कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांना प्रवेश द्यायचा की नाही, यावरून महाराष्ट्रात आधीच राजकीय-सामाजिक वातावरण तापले आहे. विश्व हिंदू परिषदेने गरबा-दांडिया कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांना प्रवेश देऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. बोरीवलीतील गरबा कार्यक्रमाच्या संदर्भात आमदार संजय उपाध्याय यांनी मुस्लिमांच्या प्रवेशाबाबत टिळा लावणे, देवीची पूजा करणे आणि कुटुंबातील महिलांसोबत येणे अशा अटींचा उल्लेख केल्यानेही वाद निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर आता या धार्मिक-सांस्कृतिक उत्सवात गरबा कार्यक्रमांच्या नावाखाली सुरू असलेल्या व्यावसायिक उपक्रमांवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
दोन ते पाच हजारांची गरबा पॅकेजेस
सोशल मीडियावर सध्या गरबा पॅकेजेसच्या विविध जाहिराती जोरदार व्हायरल होत आहेत. पहिल्या प्रकारच्या जाहिरातींमध्ये एक ते दोन हजारांचे ‘सिल्व्हर’, ‘गोल्ड’ आणि ‘प्लॅटिनम’ असे पर्याय आहेत. यामध्ये दोन ते चार तास गरबा खेळणे, गरब्याचे मूलभूत धडे देणे, पारंपरिक पोशाख पुरवणे, तसेच फोटो आणि सोशल मीडियासाठी ‘रील्स’ तयार करून देणे अशा सेवांचा समावेश आहे.
एनआरआय गरबा पार्टनर
दुसऱ्या एका जाहिरातीत ‘एनआरआय गरबा पार्टनर’ ही नवी संकल्पना मांडण्यात आली आहे. दीड ते पाच हजार रुपयांच्या या पॅकेजमध्ये चार तास गरबा खेळण्यासोबतच काल्पनिक पार्श्वभूमी (फेक बॅकस्टोरी) रचणे, मित्रांना ‘भाई-भाभी’ म्हणून चिडवणे आणि मुलीला सुखरूप घरी सोडणे अशा गोष्टी समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे, यात ‘फोरहेड किस’ आणि ‘मिस्ट्री फेवर’ यांसारख्या अत्यंत वैयक्तिक सेवांचाही उल्लेख करण्यात आला आहे.
पोलिसांकडे तक्रार
या प्रकरणाची दखल घेत, उपाध्याय यांनी २२ सप्टेंबर रोजी थेट मुंबई पोलीस आयुक्त, बोरिवली आणि दहिसर परिमंडळाचे पोलीस उपायुक्त तसेच स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र पाठवले आहे. सोशल मीडियावरील या जाहिरातींची तातडीने चौकशी करून त्यांचे आयोजक आणि जाहिरातदार कोण आहेत, याचा शोध घेण्याची मागणी त्यांनी पत्रात केली आहे. तसेच, यातून महिलांची फसवणूक, गैरव्यवहार किंवा कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होत असल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.
या पत्राच्या प्रती बोरिवली, कस्तुरबा मार्ग, एमएचबी, गोराई, समतानगर, दहिसर, चारकोप आणि कांदिवली या सर्व स्थानिक पोलीस ठाण्यांना पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत. एकिकडे गरबा कार्यक्रमांमधील प्रवेशावरून धार्मिक वाद पेटले असताना, दुसरीकडे गरबा ‘पार्टनर’ देण्याच्या बहाण्याने वैयक्तिक सेवांचे उघड व्यावसायिकरण सुरू आहे. या चित्रविचित्र जाहिरातींमुळे दहीहंडी, गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सवाच्या तोंडावर मुंबईतील सणांच्या बदलत्या स्वरूपावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या जाहिरातींमागे कोणती टोळी सक्रिय आहे का आणि प्रत्यक्षात तिथे काय चालते, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
