‘लिंक’ लागताच खड्डे बुजवले!

‘एमएमआरडीएच्या रस्त्यावर’ पालिकेचे ‘सद्भावना’ कृत्य

मालाड लिंक रोडवरीवरील खड्डय़ांबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता मुंबई’ने शुक्रवारी प्रसिद्ध केले होते. मात्र, याची कुणकुण लागताच गुरुवारी हे खड्डे बुजवण्यात आले. 
एमएमआरडीएच्या रस्त्यावरपालिकेचे सद्भावनाकृत्य

मालाड लिंक रोडवर पडलेल्या खड्डय़ांमुळे वाहनचालकांना होणाऱ्या त्रासाबद्दलचे वृत्त ‘लोकसत्ता मुंबई’त प्रसिद्ध होणार असल्याची कुणकुण लागताच मुंबई महापालिकेच्या पी उत्तर पालिका विभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी गुरुवारी रात्रीच या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम करून घेतले. विशेष म्हणजे, हे करतानाच ‘लिंक रोडच्या देखभालीची जबाबदारी एमएमआरडीएची असून आम्ही केवळ सद्भावनेतून हे खड्डे बुजवले’ असा खुलासा पालिकेतर्फे करण्यात आला. दुसरीकडे, एमएमआरडीएने आठ दिवसांत या मार्गावरील सर्व खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिले.

पावसाळा सुरू होताच मुंबईतील रस्त्यांवर खड्डे अवतरू लागले असून त्यामुळे वाहतूक कोंडीतही भर पडली आहे. ‘डी.एन.नगर ते दहिसर मेट्रो-२ ए’ या मेट्रो प्रकल्पाचे काम मालाड लिंक रोड येथेही सुरू आहे. या कामाने या मार्गावरील अर्धा रस्ता व्यापला आहे. त्यात गेल्या आठवडय़ात पडलेल्या पावसामुळे मालाड लिंक रोड येथील मीठ चौकी जंक्शन, इन ऑरबिट मॉल या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर खड्डे डोके वर काढू लागले आहेत. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने शुक्रवारी प्रसिद्ध केले; परंतु अशी बातमी प्रसिद्ध होणार असल्याची माहिती मिळताच पालिकेच्या पी उत्तर विभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी गुरुवारी रात्रीच खड्डे बुजवण्याचे आदेश दिले.

सध्या हा रस्ता मेट्रोच्या कामामुळे एमएमआरडीएच्या ताब्यात आहे. त्यामुळे या रस्त्याची देखभाल करण्याची जबाबदारी या संस्थेची आहे, असे पालिकेचे म्हणणे आहे. मात्र खड्डे भरण्याचे हे काम फारच तकलादू असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

जोरदार पाऊस आल्यास खड्डय़ात भरलेली खडी वाहून जाऊन या ठिकाणी पुन्हा खड्डे निर्माण होण्याची शक्यता स्थानिक रहिवासी विक्रम कपूर यांनी व्यक्त केली. ‘मुळात या रस्त्याची पावसाळ्याआधी डागडुजी करणे आवश्यक होते. मात्र दोन्ही संस्था परस्परांवर जबाबदारी ढकलत असल्याने सर्वसामान्यांच्या हालांना पारावार राहिलेला नाही,’ अशी तक्रार आलम शहा या स्थानिकाने केली.

 

खड्डय़ांतूनच प्रवास; ‘एमएमआरडीएच्या ताब्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीस कंत्राटदारच नाही

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवरून जाताना येणारा अनुभव यंदाही वाहनचालकांच्या वाटय़ाला येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अखत्यारीत असलेल्या रस्त्यांची पावसाळ्यापूर्वीच दुर्दशा झाली असली तरी, पावसाळा सुरू होऊनही या रस्त्यांची डागडुजी झालेली नाही. या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी एमएमआरडीएने निविदा प्रक्रिया राबवूनदेखील कोणीही कंत्राटदार पुढे न आल्याने यंदा मुंबईकरांना या रस्त्यांवरील खड्डय़ांतूनच वाट शोधत मार्गक्रमण करावे लागेल.

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर अनेक ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत. या रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी एप्रिल महिन्यात न्यायालयाने एमएमआरडीएकडे सोपवली आहे. यानंतर एमएमआरडीए प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. मात्र त्याला कोणीही प्रतिसाद दिला नाही. मात्र खडींचा तुटवडा व अल्पावधीत काम पूर्ण करण्याची जबाबदारी या दोन प्रमुख कारणांमुळे कंत्राटदार पुढे येत नसल्याची चर्चा आहे. सलग तीन वेळा निविदा मागवूनही प्रतिसाद न मिळाल्यामुळे मुंबईत पाऊस सुरू झाला तरी एकही खड्डा दुरुस्त होऊ शकला नाही. आता पावसामुळे खड्डय़ांची संख्या वाढणार असल्याने रस्त्यांची अवस्था अधिक दयनीय होणार आहे.

एमएमआरडीएने आता पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याचे ठरवले आहे; परंतु आधीचा अनुभव लक्षात घेता त्याला कितपत प्रतिसाद मिळेल, याबाबत साशंकता आहे. २६.५ किमीचा पश्चिम द्रुतगती मार्ग आणि २३.५ किमी लांबीचा पूर्व द्रुतगती मार्ग या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी १३ कोटींची निविदा देण्यात येणार आहे. यातील पूर्व द्रुतगती मार्गासाठी ३.५७ कोटी, तर पश्चिम द्रुतगती मार्गासाठी ७.४३ कोटींचे दुरुस्ती काम केले जाणार आहे.

मेट्रोच्या कामांमुळे या रस्त्यांवर पडणारे खड्डे, रस्त्यावर कोठेही पाणी साचले तर त्याचा निचरा करणे आदी कामांची जबाबदारी एमएमएआरडीएची आहे. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करण्यात येईल.   दिलीप कवठकर, उपमहानगर आयुक्त, एमएमआरडीए

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Repairing start at linking road by bmc

ताज्या बातम्या