दलित पॅंथरचे संस्थापक आणि विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय सभेत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी रिपब्लिकन नेत्यांना ऐक्याचे आवाहन केले. दलित-शोषितांच्या मुक्तीसाठी पॅंथरसारखे आंदोलन पुन्हा उभे करणे, हीच ढसाळ यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे उद्गार त्यांनी काढले.
विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांचे १५ जानेवारीला निधन झाले. रिपब्लिकन पक्ष व इतर संघटनांच्या वतीने शुक्रवारी वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सर्वपक्षीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. राजेंद्र गवई, ज.वि.पवार, अविनाश महातेकर, अर्जून डांगळे, सुमंतराव गायकवाड, मनोज संसारे, सुनील खांबे, आदी विविध रिपब्लिकन गटाचे नेते, तसेच राज्याचे वन मंत्री पतंगराव कदम, खासदार एकनाथ गायकवाड, भालचंद्र मुणगेकर, आमदार जयदेव गायकवाड यांच्यासह अनेक राजकीय-सामाजिक संघटनांचे नेते उपस्थित होते. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांनी एकत्र यावे किंवा आपापसात युती करावी, यासाठी काही तरुण कार्यकर्त्यांनी चळवळ सुरु केली आहे. ढसाळ यांच्या श्रद्धांजली सभेच्या निमित्ताने बहुतांश रिपब्लिकन गटांचे नेते एकत्र आले होते. हा धागा पकडून रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा ऐक्याची हाक दिली. या पूर्वी अनेकदा भावनिक ऐक्य झाले, परंतु ते टिकले नाही. आता पुन्हा ऐक्य करायचे असेल तर, यापूर्वी त्यात कोणत्या अडचणी आल्या, कशामुळे फाटाफूट झाली, याचा विचार करुन ऐक्य झाले तर ते कायम स्वरुपी कसे टिकेल, यासाठी एक व्यवहार्य आराखडा तयार करावा, अशी सूचना त्यांनी केली. उपस्थित कार्यकर्त्यांमधून त्याला उत्स्फूर्त साद मिळाली, परंतु त्यावर इतर कुठल्याही नेत्याने भाष केले नाही.
दलित पॅंथरच्या अध्यक्षपदी मल्लिका
ढसाळ यांच्या श्रद्धांजली सभेला त्यांची पत्नी मल्लिका व मुलगा आशुतोष हजर होते. या वेळी दलित पॅंथरच्या अध्यक्षपदी मलिका यांची निवड झाल्याचे अर्जून डांगळे यांनी जाहीर केले.