मान्यतेपूर्वीच मुलाखती उरकल्याचा मुंबई विद्यापीठातील प्रकार

मुंबई : संशोधन केंद्राला मान्यता मिळण्यापूर्वीच पीएचडीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांच्या मुलाखती उरकल्याचा प्रकार मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात (अ‍ॅकेडमी ऑफ थिएटर आटर्स) घडला आहे. विद्यापीठाने पेट परीक्षेची जाहिरात दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

 मुंबई विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे संशोधन केंद्र नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी अन्य विद्यापीठांमध्ये जावे लागते. या विभागाच्या प्रमुखांनी ४ ऑक्टोबरला नेट सेट उत्तीर्ण झालेल्या १९ विद्यार्थ्यांच्या पीएचडीसाठी मुलाखती घेतल्या. परंतु विद्यापीठाने ६ ऑक्टोबरला जाहीर केलेल्या पेट परीक्षेच्या यादीत या विभागाचे नावच नसल्याचे उघडकीस आले. त्यावेळी या विभागाला संशोधन केंद्राची मान्यता नसल्याचे समजले.विभाग प्रमुखांनी एक समिती नेमून या मुलाखतीतून तीन जणांची निवड केली होती. या तिघांनाही प्रतीक्षायादीत ठेवले होते. 

‘विद्यार्थ्यांना नाट्यशास्त्र  विभागात पीएचडी करायला मिळणे याचा आनंदच आहे. पण  संशोधन केंद्राला मान्यता नसताना मुलाखती घेणे योग्य नाही. किंबहुना विद्यापीठाने या विभागाला संशोधन केंद्र देण्यास का दिरंगाई केली याचाही विचार व्हायला हवा. कोणत्याही गैरप्रकारातून विद्यापीठाची बदनामी होऊ नये एवढेच आम्हाला वाटते. संबधित विद्यार्थ्यांचा विचार करून विद्यापीठाने त्यांना पेट परीक्षेची परवानगी द्यावी,’ अशी मागणी अधिसभा सदस्य धनराज कोहचाडे यांनी केली आहे.

विद्यापीठाने ऑनलाइन प्रक्रियेतून हे अर्ज मागविले होते. त्यानुसार २४ विद्यार्थ्यांचे अर्ज आले. विभागातील डॉ. मंगेश बनसोडे हे पीएचडी मार्गदर्शक असल्याने विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. आरआरसीच्या मान्यतेनंतरच पुढील प्रक्रिया होईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. आमच्या विभागाला संशोधन केंद्र द्यावे, यासाठी विद्यापीठ प्रशासनासोबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्या संदर्भात प्रक्रिया सुरू असून लवकरच विभागाला संशोधन केंद्र म्हणून मान्यता मिळेल.

 – योगेश सोमण, विभाग प्रमुख, नाट्यशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ