मुंबईसह भारतभरातून वैद्यकीय शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने वाहत्या गंगेत हात धुण्यासाठी रशियाने भारतीय विद्यार्थ्यांकरिता आता राखीव जागांची शक्कल लढविली आहे.
रशियातील अनेक विद्यापीठांनी २००० पासून इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यास सुरूवात केली. तेव्हापासून रशियात येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ वाढतो आहे. भारतातूनही मोठय़ा संख्येने विद्यार्थी रशियात उच्चशिक्षणासाठी जात आहेत. २००१च्या आसपास रशियात शिकण्यासाठी येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या केवळ १०० ते १२० च्या आसपास होती. दहा वर्षांत ही संख्या दहापटीने वाढली. एज्युरशियाने केलेल्या एका सव्‍‌र्हेक्षणानुसार २०१०मध्ये ६७० आणि २०१२मध्ये ११०० इतके भारतीय विद्यार्थी रशियात उच्चशिक्षणासाठी गेले होते. यात सर्वाधिक संख्या वैद्यकीय शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे. कारण १० पैकी ८ विद्यार्थी हे वैद्यकीय शिक्षण घेणारे आहेत. त्या खालोखाल अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची मागणी आहे. व्यवस्थापन व मानव्य शाखांमधील अभ्यासक्रम हे अजुनही केवळ रशियन भाषेत शिकविले जात असल्याने त्यांना परदेशी विद्यार्थ्यांकडून मागणी नाही.
रशियाचे प्रोत्साहन
रशियात वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना वर्षांकाठी अडीच लाख रुपयांच्या आसपास शुल्क मोजावे लागते. हे शुल्क मुंबईतील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील शुल्कापेक्षा कमी आहे. मात्र, अमेरिका आणि इंग्लंडमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी याच्या पाचपट शुल्क मोजावे लागते. रशियात वैद्यकीय शिक्षणासाठी जाण्याकडे भारतीय विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असल्याने येथील अनेक सरकारी आणि खासगी विद्यापीठांनी परदेशी विद्यार्थ्यांसाठीच्या जागांमध्ये वाढ केली आहे. त्यानुसार भारतातील विद्यार्थ्यांकरिता ३७५ अतिरिक्त जागा उपलब्ध झाल्या आहेत.