scorecardresearch

मुंबई : बेस्ट बसधील आसनाचे आधीच आरक्षण करता येणार ; प्रवाशांसाठी सप्टेंबरपासून मोबाइल ॲप आधारित सेवा सुरू होणार

सकाळी किंवा सायंकाळी गर्दीच्या वेळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांना काळी-पिवळी टॅक्सी वेळेत उपलब्ध होत नाही.

मुंबई : बेस्ट बसधील आसनाचे आधीच आरक्षण करता येणार ; प्रवाशांसाठी सप्टेंबरपासून मोबाइल ॲप आधारित सेवा सुरू होणार
संग्रहित छायाचित्र

कार्यालयीन वेळेत बेस्ट बसगाड्यांना होणारी गर्दी आणि खासगी प्रवासी बसगाड्यांच्या वाढत्या स्पर्धेमुळे बेस्ट उपक्रमाने मोबाइल ॲपआधारित टॅक्सीप्रमाणे बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेद्वारे प्रवाशांना बसमधील आसनही आगाऊ आरक्षित करता येईल. ही सेवा सप्टेंबरमध्ये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपक्रमातील अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळी किंवा सायंकाळी गर्दीच्या वेळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांना काळी-पिवळी टॅक्सी वेळेत उपलब्ध होत नाही. अनेक वेळा टॅक्सीचालक भाडे नाकारतात. अशा विविध कारणांमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप होतो. त्यामुळे हळूहळू अनेक प्रवासी मोबाइल ॲपआधारित खासगी टॅक्सींमधून प्रवास करणे पसंत करतात. प्रवाशांच्या पसंतीस उतरल्याने या सेवांनी विविध योजनाही सुरू केल्या आहेत. याशिवाय मुंबई उपनगरात ॲपआधारित खासगी प्रवासी वातानुकूलित बस सेवाही सुरू झाली आहे. त्याकडेही मोठ्या संख्येने प्रवासी आकर्षित झाले आहेत. त्यामुळे आता बेस्ट उपक्रमानेही या स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

ही सेवा कशी सुरू करता येईल याबाबत सध्या अभ्यास करण्यात येत आहे. सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ही सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात येईल. यासाठी आरामदायी ४५ आसनी १०० लक्झरी बसगाड्या टप्प्याटप्प्याने ताफ्यात दाखल होणार आहेत. या सेवेत धावणाऱ्या बसगाड्यांमधून प्रवाशांना उभ्याने प्रवास करता येणार नाही. या बसमधील आसन आधीच आरक्षित करावे लागेल. त्यासाठी मोबाइल ॲप उपलब्ध करण्यात येईल, असे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

मोबाइल ॲपद्वारे प्रवाशांना बसचा मार्ग, वेळ, अन्य बस सेवा आदींची माहिती मिळेल. त्यानुसार नियोजन करून प्रवाशांना बसमधील आसन आरक्षित करता येईल आणि त्याचे तिकीट ऑनलाईन घेता येईल. आसन आरक्षित करणाऱ्या प्रवाशांनाच या बसमध्ये प्रवास करता येणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.