मुंबई : गेल्या दीड वर्षामध्ये राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नऊ वेळा निवासी डॉक्टरांवर हल्ले करण्यात आले असून या घटनांमुळे रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये निवासी डाॅक्टरांवर झालेल्या हल्ल्यामुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निवासी डॉक्टरांना पुरविण्यात येणारी सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र केंद्रीय मार्डने राज्य सरकारला पाठवले आहे.

अकोला येथील ३ मे २०२४ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात शस्त्रक्रिया करणाऱ्या निवासी डॉक्टरांवर रुग्णांच्या नातेवाईकांकडून हल्ला केला. राज्यातील आठ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वर्षभरामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी हल्ले केले आहेत. डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्यावर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मागील वर्षी जानेवारीमध्ये यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरांवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर चंद्रपूरमध्ये मे आणि सप्टेंबरमध्ये दोन वेळा हल्ले झाले. डिसेंबर २०२३ मध्ये पिंपरी येथील वैद्यकीय महाविद्यालयात, २९ जानेवारी २०२४ मध्ये पुन्हा चंद्रपूरमध्ये, ४ मार्च २०२४ रोजी पिंपरी वैद्यकीय महाविद्यालयात, १९ एप्रिल २०२४ मध्ये अकोला येथे, २१ एप्रिल २०२४ रोजी संभाजी नगर आणि ३ मे २०२४ रोजी अकोला वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरांवर हल्ला करण्यात आला होता. जानेवारी २०२३ पासून आतापर्यंत निवासी डॉक्टरांवर तब्बल नऊ वेळा हल्ले करण्यात आले आहेत.

हेही वाचा – निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या नऊ हजार बसची धाव, महामंडळाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांची भर

हेही वाचा – वैद्यकीय विद्यार्थ्यांना आता महाविद्यालय बदलता येणार नाही, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

निवासी डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचा परिणाम डॉक्टरांच्या शैक्षणिक प्रगतीवरही होत असतो. हे वातावरण डॉक्टरांच्या विकासासाठी घातक असते. परिणामी, भविष्यात डॉक्टरांना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळावे यासाठी त्यांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरविणे आवश्यक आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये सुरक्षा उपाय अधिक भक्कम करावी, जेणेकरून निवासी डॉक्टरांवरील पुढील हल्ले थांबवता येऊ शकतात, असे पत्र केंद्रीय मार्डने वैद्यकीय शिक्षण मंत्री, गृहमंत्री, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक आणि राज्यातील सर्व सरकारी व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठाता आदींना पाठवले आहे.