scorecardresearch

निवासी डॉक्टर आजपासून संपावर

निवासी डॉक्टर गेले जवळपास दीड वर्ष करोना सेवेमध्ये असल्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रम शिकविलेला नाही.

निवासी डॉक्टर आजपासून संपावर

राज्यातील रुग्णव्यवस्था कोलमडण्याची भीती

मुंबई: शैक्षणिक शुल्क माफीसह विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही अनेक महिने उलटले तरी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने अद्याप कार्यवाही न केल्यामुळे संतप्त झालेल्या निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने अखेर आजपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील सर्व निवासी डॉक्टर संपावर जाणार असल्यामुळे रुग्णव्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे.

निवासी डॉक्टर गेले जवळपास दीड वर्ष करोना सेवेमध्ये असल्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रम शिकविलेला नाही. तेव्हा शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी मार्डतर्फे गेल्या अनेक महिन्यांपासून केली जात आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत दोन महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीत मंत्री अमित देशमुख यांनीही या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतरही यावर ठोस कार्यवाही विभागाने केलेली नाही. त्यामुळे अखेर मार्डने शुक्रवारपासून राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर संपावर जाण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून डॉक्टर संपावर जाणार असून आपत्कालीन आणि अतिदक्षता विभागातील सेवा सुरू असतील असे मार्डने स्पष्ट केले आहे.

संपाबाबत मार्डची वैद्यकीय संशोधन आणि संचालनालयाच्या संचालकांसोबत सेंट जॉर्ज रुग्णालयात गुरुवारी रात्री उशीरापर्यत बैठक सुरू होती. या बैठकीनंतर पुढील दिशा ठरेल असेही मार्डने सांगितले आहे.

सद्य:स्थितीमध्ये करोनाबाधितांची संख्या कमी असली तरी राज्यात सध्या ३६ हजार ६७५ रुग्ण उपचाराधीन आहेत, तर सुमारे १७ हजार रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तसेच करोना संक्रमण कमी झाल्यामुळे आता बहुतांश रुग्णालयांमध्ये इतर आजारांच्या सेवा, रखडलेल्या शस्त्रक्रियाही सुरू झालेल्या आहेत. परिणामी रुग्णालयावरील ताण पुन्हा वाढू लागला आहे. शासकीय महाविद्यालयांचा डोलारा हा निवासी डॉक्टरांवर अवलंबून असतो. अशा परिस्थितीमध्ये निवासी डॉक्टर संपावर गेल्यास रुग्णसेवेवर नक्कीच परिणाम होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Resident doctors on strike from today fear of collapse of medical system in the state akp