डॉक्टरांना रजेवर पाठवण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन
जेजे रुग्णालयातील नेत्ररोगचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांना रजेवर पाठवण्याचे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी निवासी डॉक्टरांना दिले. संबंधित प्राध्यापकांकडून निवासी डॉक्टरांच्या परीक्षेतील गुणांवर कोणताही परिणाम होणार नाही, या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितल्यावरही जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांच्या कामकाजाविरोधात निवासी डॉक्टरांनी रविवारपासून पुकारलेले आंदोलन सुरूच ठेवले आहे.
निवासी डॉक्टरांनी बुधवारी पुन्हा विनोद तावडे यांची भेट घेतली. त्या वेळी डॉ. पारेख यांना काही दिवस रजेवर पाठवण्याचा निर्णय तावडे यांनी घेतला. अधिष्ठाता तसेच प्राध्यापकांकडून निवासी डॉक्टरांच्या परीक्षेच्या गुणांवर किंवा शिक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, परीक्षक बदलले जातील तसेच एमसीआयच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली जाईल, असेही तावडे म्हणाले. जेजेचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने व नेत्ररोगचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख हे योग्यप्रकारे शिकवत नसून शस्त्रक्रियाही करू देत नसल्याचा आरोप करत या दोघांचीही बदली करण्याची मागणी निवासी डॉक्टरांकडून करण्यात आली. यासंबंधी योग्य ती तपासणी करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडून दिले गेल्यावरही निवासी डॉक्टरांनी मास बंक सुरू ठेवला आहे.

अधिष्ठाता तसेच प्राध्यापकांकडून निवासी डॉक्टरांच्या परीक्षेच्या गुणांवर किंवा शिक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, परीक्षक बदलले जातील तसेच एमसीआयच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली जाईल.
– विनोद तावडे, शिक्षणमंत्री