मुंबईतील जेजे रुग्णालयातील डॉक्टरांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून उद्यापासून राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील व रुग्णालयांतील डॉक्टरांनी संपाची हाक दिली आहे. मात्र त्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होतील, याचा विचार करून डॉक्टरांचा संप मोडून काढण्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायद्याखाली (मेस्मा) कारवाई सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.
जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने व नेत्ररोगचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधात डॉक्टरांनी रविवारपासून संप सुरू केला आहे. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या व दाखल असलेल्या रुग्णांवर त्याचा परिणाम होत आहे. या आंदोलनाचे विधिमंडळातही पडसाद उमटले. दोन दिवसांपूर्वी विधान परिषदेत, जे.जे.तील डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल होत आहे, अशी चिंता व्यक्त करीत त्याबाबत सरकारने हा संप त्वरित मिटविण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी विरोधी सदस्यांनी केली होती. उपसभापती वसंत डावखरे यांनीही आंदोलनाबद्दल नापसंती व्यक्त करीत, सरकारला हस्तक्षेप करून संप मिटविण्याचे निर्देश दिले.