scorecardresearch

आरोग्य सेवेच्या विस्ताराचा संकल्प; भांडुप सुपर स्पेशालिटीसह अन्य तीन रुग्णालयांचे भूमिपूजन

करोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर पालिकेने आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारावर लक्ष केंद्रित केले आहे. भांडुप येथील सुपरस्पेशालिटी रुग्णालयासह नायरमधील कर्करोगाच्या उपचारांसाठी विस्तारित इमारत आणि चांदिवलीतील उपनगरीय रुग्णालयांच्या कामांचे भूमिपूजन येत्या आठवडय़ात पालिका करणार असून लवकरच बांधकाम सुरू होणार आहे

प्रतिनिधिक छायाचित्रमुंबई : करोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर पालिकेने आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारावर लक्ष केंद्रित केले आहे. भांडुप येथील सुपरस्पेशालिटी रुग्णालयासह नायरमधील कर्करोगाच्या उपचारांसाठी विस्तारित इमारत आणि चांदिवलीतील उपनगरीय रुग्णालयांच्या कामांचे भूमिपूजन येत्या आठवडय़ात पालिका करणार असून लवकरच बांधकाम सुरू होणार आहे.करोनाकाळात मुंबईतील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अपुरी असल्याचे प्रकर्षांने जाणवले आहे. त्यामुळे या वर्षी अर्थसंकल्पामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत भांडवली खर्चासाठी दुपटीने वाढ करत सुमारे २ हजार ६६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याचा विनियोग करण्यासाठी पालिकेने सुरुवात केली आहे.

गेली अनेक वर्षे रखडलेल्या पालिकेच्या रुग्णालयांचे प्रकल्पही मार्गी लावले जात आहेत. भांडुप येथील दहामजली सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचा भूमिपूजन कार्यक्रम माजी नगरसेवकांनी कार्यकाल संपत असल्यामुळे घाईने मार्चच्या पहिल्या आठवडय़ात उरकला. या वेळी या प्रकल्पासाठी कंत्राटदार नियुक्तीच्या प्रस्तावाला स्थायी समितीमध्ये मंजुरीही मिळाली नव्हती. ‘स्थायी समितीने याला मंजुरी दिली असून आता याचे काम लवकरच सुरू होईल. त्यामुळे येत्या आठवडय़ात या रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यात येईल. यासोबतच चांदिवली येथील उपनगरीय रुग्णालय आणि नायरमधील विस्तारित इमारतीच्या बांधकामासाठी निविदांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे यांचेही भूमिपूजन येत्या आठवडय़ात करण्यात येणार आहे,’ असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. भांडुपच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात ३६० खाटांची सुविधा असणार आहे. तसेच या रुग्णालयात अतिदक्षता विभागाच्या ८० खाटाही उपलब्ध असतील. याव्यतिरिक्त रेडिओलॉजी, केमोथेरपी, स्त्रीरोग आणि प्रसूती, शस्त्रक्रिया, नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग, कान-नाक-घशाचे आजार, नेत्ररोग आदी विभागही सुरू होणार आहेत.  चांदिवलीमध्ये संघर्षनगर भागात २५० खाटांचे नवीन उपनगरीय रुग्णालय उभारण्यात येणार आहे. नायरच्या विस्तारित इमारतीमध्ये पेट स्कॅन सुविधेसह कर्करोगाच्या उपचारांसाठी स्वतंत्र केंद्र असणार आहे.

हे प्रकल्प पूर्णत्वास

कूपर रुग्णालयातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून पुढील आठवडय़ात या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच यासोबतच नायर दंत रुग्णालयाच्या नवी इमारतीचे कामही पूर्ण झाले असून याचेही उद्घाटन येत्या काही दिवसांमध्ये केले जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही इमारती लवकरच कार्यरत होणार आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Resolve expand healthcare bhumipujan hospitals including bhandup super specialty amy