पाच वर्षांकरिता दरमहा साडेपाच लाख रुपये भाडे

मुंबई : टाळेबंदीनंतर भायखळा येथील जिजामाता भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यानात पर्यटकांची गर्दी वाढू लागली असून राणीच्या बागेत फेरफटका मारणाऱ्या पर्यटकांची खानपानाची सोय करण्यासाठी उद्यानात उपाहारगृह उभारण्यात आले आहे. हे उपाहारगृह चालवण्यासाठी पालिकेने कंत्राटदाराची निवड केली असून पाच वर्षांकरिता साडेपाच लाख रुपये भाडे देऊन कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे.

पालिकेने जिजामाता उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या आधुनिकीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याअंतर्गत उद्यानाच्या परिसराचे आधुनिकीकरण सुरू असून उद्यान परिसरात छोटेखानी तब्बल ६३ बागा आहेत. तसेच प्राण्यांचे १७ पिंजरे आहेत. या पिंजऱ्यांचे बांधकाम सुरू आहे. तसेच पेंग्विन कक्षाची उभारणी करून तो २०१७ पासून पर्यटकांकरिता खुला करण्यात आला आहे. टाळेबंदीमध्ये बंद असलेले उद्यान व प्राणिसंग्रहालय आता खुले करण्यात आले असून वीस दिवसांत लाखभर पर्यटकांनी उद्यान व प्राणिसंग्रहालयाला भेट दिली आहे.

जसजसे प्राण्यांचे पिंजरे तयार होतील व नवे प्राणी दाखल होतील तसतशी पर्यटकांची संख्या वाढत जाणार आहे. एवढय़ा मोठय़ा संख्येने पर्यटक आल्यास त्यांच्या खानपानाची सोय व्हावी याकरिता पेंग्विन कक्षाच्या इमारतीत पालिकेने ५३३ चौ. मीटर जागेवर उपाहारगृह उभारले आहे. हे उपाहारगृह चालवण्यासाठी पालिका कंत्राटदाराची नेमणूक करणार आहे. त्यानुसार पाच वर्षांसाठी दरमहा पाच लाख ५० हजार रुपये भाडय़ाने देण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत वार्षिक किमान ६६ लाख रुपयांची तर पाच वर्षांत तीन कोटी ५० लाख रुपयांची भर पडणार आहे. या भाडय़ामध्ये दरवर्षी पाच टक्के वाढ होणार आहे.

पेंग्विनमुळे उत्पन्नात वाढीचा दावा

पेंग्विन कक्ष व त्यावरील खर्च महापालिकेत चर्चेचा विषय ठरत आला आहे. पेंग्विन कक्षाच्या देखभालीवर होणारा खर्च अधिक असल्यामुळे विरोधी पक्षांनी शिवसेनेवर टीका केली होती. मात्र पेंग्विन राणीच्या बागेत आणल्यानंतर उत्पन्नात वाढ झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. त्यामुळे राणीच्या बागेचे उत्पन्न वाढण्यासाठी पालिकेने आता उपाहारगृह भाडय़ाने देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीच्या पटलावर सादर करण्यात आला आहे.