करोनाकाळात जादा प्रवाशांची वाहतूक; २७६ तक्रारींनुसार कारवाई

मुंबई : करोनाकाळात प्रवासी वाहतुकीवर निर्बंध असतानाही जादा प्रवाशांची वाहतूक करण्याचा प्रयत्न रिक्षा-टॅक्सी चालकांकडून करण्यात आला. निर्बंध धाब्यावर बसवून अधिक प्रवाशांची वाहतूक करून अधिक पैसे उकळून प्रवाशांचीही लूट करण्याचे प्रकार घडल्याची माहिती आरटीओतील सूत्रांनी दिली. या संदर्भात करण्यात आलेल्या २५६ तक्रारींच्या आधारे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात आली. 

करोनाच्या सुरुवातीच्या काळात रिक्षा, टॅक्सीसह सार्वजनिक वाहतुकीमधील प्रवासी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले होते. यात रिक्षातून तीनऐवजी दोनच प्रवाशांची वाहतूक करण्याचा बंधन घालण्यात आले होते. शेअर रिक्षाचालकांनाही हाच नियम लागू झाला. शासनाने हळूहळू निर्बंध शिथिल के ले, तरीही या नियमातून रिक्षाचालकांना शिथिलता देण्यात आलेली नाही. त्यामुळे करोनाकाळात मीटर आणि शेअर रिक्षांमधून मुंबईतील काही भागात जादा प्रवासी घेऊन जाण्याचे प्रकार घडतात. रिक्षातून दोनऐवजी तीन प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालकावर कारवाई करण्यात येते. मात्र असे असतानाही काही चालक चौथा प्रवासी आपल्या बाजूला बसवून बिनदिक्कतपणे घेऊन जातात. त्यामुळे सर्वच नियमांना तिलांजली दिली जात आहे. जादा प्रवाशांकडून अधिक भाडे घेण्यात येत आहे. टॅक्सीतूनही तीनच प्रवाशांना नेण्यास परवानगी आहे. मात्र टॅक्सीचालकही हा नियम धाब्यावर बसत असल्याचे निदर्शनास आले आहे.मीटर रिक्षातून दोनऐवजी तीन प्रवासी घेऊन जाताना चालक प्रवाशांकडून दहा ते पंधरा रुपये जादा घेतात, असे आढळले.

कुठे कारवाई?

’ बोरिवली आरटीओकडे जादा प्रवासी वाहतुकीच्या ३७ तक्रारी आल्या होत्या आणि त्यांची दखल घेत संबंधितांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली.

’ अंधेरी आरटीओने जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या ८२ जणांविरुद्ध कारवाई केली. यात एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या काळात ५७ आणि एप्रिल २०२१ ते सप्टेंबर २०२१ मध्ये २५ प्रकरणांचा समावेश असल्याचे आरटीओतील सूत्रांनी सांगितले.

’ ताडदेव आरटीओनेही जादा प्रवासी, जादा भाडे, प्रवाशांशी उद्धट वर्तन यांबाबत आलेल्या तक्रारीनंतर ५६ टॅक्सी चालकांवर दंडात्मक कारवाई केली. यापैकी ३४ चालकांचे लायसन्स (अनुज्ञप्ती) निलंबित करण्यात आले.

जादा भाडे दराची मागणी

वडाळा आरटीओच्या हद्दीत रिक्षाचालकांविरोधात केलेल्या कारवाईत जादा प्रवासीऐवजी जादा भाडे घेण्याच्या तक्रारींचे प्रमाण अधिक होते. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ मध्ये ६७ आणि एप्रिल २०२१ ते सप्टेंबर २०२१ मध्ये ३४ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यांवर दंडात्मक कारवाइसह लायसन्स निलंबनाचीही कारवाई केली.

बेस्ट बसगाड्यांमधून मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करीत आहेत. या गाड्यांना प्रचंड गर्दीही होते आणि करोनाकाळात रिक्षातून तीनऐवजी दोन प्रवाशांची वाहतूक करण्याचा नियम अद्यापही कायम आहे. तीन प्रवासी घेऊन जाण्याची परवानगी सरकारने द्यावी.

– शशांक राव, अध्यक्ष, मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियन