गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पालिकेतील दोघा कार्यकारी अभियंत्यांच्या पुनर्नियुक्तीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. यापुढे ताज्या दमाचे अभियंते घेतले जातील, प्राधिकरणात आता पुनर्नियुक्ती मिळणार नाही, असे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.

शांतीलाल टाक आणि राजेंद्र गांधी या पालिकेतील दोघा कार्यकारी अभियंत्यांची झोपु प्राधिकरणात प्रतिनियुक्ती करण्यात आल्याचे आदेश पालिकेच्या नगर अभियंत्यांनी जारी केले.

त्यानुसार हे दोन्ही कार्यकारी अभियंते प्राधिकरणात रुजू होण्यासाठी आले. मात्र त्यांना रुजू करून घेण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी नकार दिला. त्यांना शासनाकडून आदेश आणण्यास सांगण्यात आले. त्यामुळे या दोन्ही अभियंत्यांची निराशा झाली.

प्रकरण काय? : गेल्या तीन वर्षांत दीपक कपूर यांनी प्राधिकरणात शिस्त आणली होती. अभियंत्यांची मनमानी ठेचून काढली, विकासकांनाही नियमबाह्य मदत करण्याच्या पद्धतीला आळा घातला होता. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत प्राधिकरणात नियुक्त होण्यास अभियंते इच्छुक नव्हते. कपूर यांची बदली झाल्यावर टाक व गांधी यांनी लगेच पुनर्नियुक्ती करून घेतली. मात्र त्यास विरोध करताना गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांनी यापुढे प्राधिकरणात कुठल्याही अभियंत्याची पुनर्नियुक्ती केली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांच्या काळात वादग्रस्त ठरलेल्या व आता कार्यकारी अभियंता म्हणून बढती मिळालेल्या एस. वाय. थत्ते यांनीही पुन्हा नियुक्ती व्हावी, यासाठी प्रयत्न चालविले आहेत. मात्र नव्या निर्णयामुळे त्यांचीही पंचाईत झाली आहे.